Pimpri: मोरवाडी न्यायालयाचे कामकाज चालणार नेहरुनगर येथून;  महासभेची मंजुरी

एमपीसी न्यूज – मोरवाडी न्यायालयाचे नेहरुनगर येथे तात्पुरत्या स्वरुपात स्थलांतरण होणार आहे. अण्णासाहेब मगर क्रीडा संकुलासमोरील वाचनालय आणि दवाखान्यासाठी बांधलेल्या इमारतीतून न्यायालयाचे कामकाज चालणार आहे. पाच वर्षासाठी ही इमारत न्यायालयासाठी भाड्याने देण्यात येणार असून त्यापोठी दरमहा 8 लाख 77 हजार रुपये भाडे निश्चित करण्यात आले आहे. याबाबतच्या प्रस्तावाला आज झालेल्या महासभेत मान्यता देण्यात आली.

पिंपरी न्यायालयाचे कामकाज 8 मार्च 1989 मध्ये मोरवाडी येथील महापालिकेच्या शाळा इमारतीमध्ये सुरु झाले. न्यायालयीन कामकाजासाठी ही इमारती अपुरी पडत आहे. राज्य सरकारने न्यायालयाठी पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या हद्दीतील मोशी, बो-हाडेवाडी येथील पेठ क्रमांक 14 मधील 6.57 हेक्टर (15 एकर) जागा न्यायसंकुलासाठी मंजूर करण्यात आली आहे. परंतु, न्यायालयाच्या इमारतीचे बांधकाम सुरु झाले नाही.

मोरवाडी न्यायालयाची जागा अपुरी पडत असल्याने न्यायालयीन कामकाजासाठी पिंपरी-चिंचवड अॅडव्हेकेट बार असोसिएशनने अजमेरा सोसायटी येथील महापालिका शाळेसाठी बांधलेल्या इमारतीमधील जागेची मागणी पाच वर्षासाठी केली होती. महापालिकेने देखील जागा देण्याची तयारी दर्शविली होती. तथापि, त्याला स्थानिकांनी विरोध केला. त्यामुळे तो प्रस्ताव बारगळला होता.

त्यानंतर नेहरुनगर येथील अण्णासाहेब मगर क्रीडा संकुलासमोरील जागा न्यायालयासाठी निश्चित करण्यात आली. या जागेवर वाहनतळ, टपाल कार्यालय, वाचनालय, दवाखान्याचे आरक्षण आहे. त्यापैकी दवाखाना आणि वाचनालयाच्या इमारतीचे बांधकाम झाले आहे. वाचनालय आणि दवाखानाच्या इमारतीमध्ये न्यायालयाचे कामकाज चालणार आहे. त्यासाठी 8 लाख 77 हजार रुपये भाडे प्रतिमहिना पाच वर्षासाठी आकारण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.