Pimpri: शहरात जानेवारी 2020 च्या पहिल्या आठवड्यात ‘मोरया युथ फेस्टिव्हल’; राज्य लेखा समितीचे अध्यक्ष ॲड. सचिन पटवर्धन यांची माहिती

तरुणाईच्या कलागुणांना 'मोरया युथ फेस्टिव्हल'चे व्यासपीठ

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवडमध्ये शिक्षण, कला, क्रीडा, सांस्कृतिक, आरोग्य, पर्यावरण या क्षेत्रात सामाजिक उपक्रम राबविणारी कर्तव्य फाऊंडेशन ही अग्रगण्य संस्था आहे. या संस्थेच्या वतीने शहरातील युवक युवतींना सांस्कृतिक, कला आणि क्रीडा क्षेत्रात आपल्यातील गुण कौशल्य सादर करण्यासाठी जानेवारी 2020 च्या पहिल्या आठवड्‌यात ‘मोरया युथ फेस्टिव्हल 2020’ चे भव्य आयोजन केले आहे, अशी माहिती फाऊंडेशनचे अध्यक्ष व राज्य लेखा समितीचे अध्यक्ष ॲड. सचिन पटवर्धन यांनी आज (सोमवारी) पिंपरीत पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी नगरसेवक बाबू नायर, कामगार नेते इरफान सय्यद, माजी नगरसेविका ज्योतिका मलकानी, किरण येवलेकर, राजेश पाटील आदी उपस्थित होते.

जानेवारी 2020 च्या पहिल्या आठवड्‌यात या फेस्टिव्हलचे उद्‌घाटन व समारोप भव्य प्रमाणात करण्यात येणार आहे. शहरातील शंभरहून जास्त महाविद्यालये या फेस्टिव्हलमध्ये सहभागी होतील. युवकांमध्ये शारिरीक, मानसिक बळ वाढविणारा आणि युवा पिढीला व्यसनांपासून दूर राहण्यास प्रोत्साहित करणारा ‘मोरया युथ फेस्टिव्हल’ शहराचा मानाचा तुरा ठरेल, असा विश्वास ॲड. सचिन पटवर्धन यांनी व्यक्त केला.

मागील वर्षी या फेस्टिव्हलमध्ये पिंपरी-चिंचवड शहरातील 56 पेक्षा जास्त महाविद्यालयातील 3400 हून जास्त युवकांनी विविध स्पर्धांमध्ये सहभाग घेतला होता. या महोत्सवात यावर्षी नृत्य स्पर्धा, कॅरम, बुद्धीबळ, छायाचित्रण, वक्तृत्व, फुटबॉल, हॉकी, कबड्डी, टेबल टेनिस, क्रिकेट, रांगोळी, मेहंदी आणि ऑन द स्पॉट पेंटींग अशा वैयक्तिक व सांघिक स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. विजेत्या स्पर्धकांना समारोप कार्यक्रमात आकर्षक बक्षीस, प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे.

तसेच युवकांना मार्गदर्शन करण्यासाठी स्पर्धा परिक्षेची तयारी, आरोग्याचे महत्व, उद्योग व्यवसायातील संधी, जॉब फेअर, व्यवसाय सुरु करण्यासाठी शासकीय, वित्तीय संस्थांचे मार्गदर्शन, उच्च शिक्षणासाठी देशात व परदेशातील संधी या विषयी सहाय्य व मार्गदर्शन, महिलांचे हक्क, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील संधी अशा विविध विषयांवर ज्येष्ठ मान्यवरांची व्याख्याने व मार्गदर्शन शिबिरे फाऊंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात येणार आहेत.

‘मोरया युथ फेस्टिव्हल 2020’ अंतर्गत घेण्यात येणा-या सर्व स्पर्धांचे वेळापत्रक व इतर माहिती महाविद्यालयात वेळोवेळी देण्यात येईल. या फेस्टिव्हलमध्ये जास्तीत महाविद्यालयीन विद्यार्थी, विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे, असेही आवाहन ॲड. पटवर्धन यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.