Pimpri: मोशी, दिघीतील दोघांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह; आजपर्यंत 84 जणांना कोरोनाची लागण

सक्रिय रुग्णांची संख्या पोहचली 60 वर, 24 जण कोरोनामुक्त  

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील मोशी, दिघी परिसरातील एक पुरुष आणि  एक महिला  असे दोघांचे रिपोर्ट आज (शनिवारी)  पॉझिटीव्ह आले. त्यामुळे त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे कोरोनाबाधित सक्रिय रुग्णांचा आकडा 60 वर पोहचला आहे. आजपर्यंत 84 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर, 24 जण कोरोनामुक्त झाले असून, चौघांचा मृत्यू झाला आहे.

महापालिकेचे अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिलेल्या माहितीनुसार महापालिकेने शुक्रवारी (दि. 24) 107 जणांचे  नमुने तपासणीसाठी एनआयव्हीकडे पाठविले होते. त्याचे रिपोर्ट आज आले आहेत. त्यामध्ये मोशी, दिघीतील रहिवाशी असलेल्या 65 वर्षीय महिलेला आणि 52 वर्षाच्या पुरुषाला कोरोनाची लागण  झाल्याचे निदान झाले.   तर, आज कोरोनामुक्त झालेले तीनजण दिघी, भोसरी परिसरातीलच रहिवाशी होते.

आजचा वैद्यकीय अहवाल !

#दाखल झालेले संशयित रुग्ण – 126
# पॉझिटीव्ह रुग्ण – 02
#निगेटीव्ह रुग्ण – 69
#चाचणी अहवाल प्रतिक्षेतील रुग्ण – 136
#रुग्णालयात दाखल एकूण संख्या – 183
#डिस्चार्ज झालेले एकूण रुग्ण – 69
#आजपर्यंतची कोरोना पॉझिटीव्ह संख्या – 84
# सक्रिय पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या – 60
# शहरातील कोरोना बाधित नऊ रुग्णांवर महापालिका क्षेत्राबाहेरील रुग्णालयात उपचार सुरु
# आजपर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या –  4
#आजपर्यंत कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या – 24
# दैनंदिन भेट दिलेली घरे – 14039
#दैनंदिन सर्वेक्षण केलेली लोकसंख्या – 42836

मागील आठरा दिवसांत 59 नवीन रुग्णांची भर !

शहरात 8 एप्रिलपासून दररोज कोरोनाचे पॉझिटीव्ह रुग्ण येत आहेत. 8 एप्रिलला एक, 9 ला तीन, 10 एप्रिल रोजी चार, 11 एप्रिलला दोन , 12 एप्रिलला पाच, 13 एप्रिल रोजी दोन, 14 एप्रिल  रोजी एकाच दिवशी सहा, 15 एप्रिल रोजी चार, 16 एप्रिल रोजी चार, 17 एप्रिल रोजी दोन, 18 एप्रिल रोजी सात, 19, 20, 21  एप्रिल रोजी प्रत्येकी एकाचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले होते.  22 एप्रिल रोजी तीन, 23 एप्रिल रोजी तीन रुग्ण,   24 एप्रिल रोजी  एकाच दिवशी 11 रिपोर्ट पॉझिटीव्ह आले होते. त्यामध्ये आज 25 एप्रिल रोजी दोन जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्याने मागील आठरा दिवसात तब्बल 59 नवीन रुग्णांची भर पडली आहे.

दरम्यान, 10 मार्चपासून पिंपरी-चिंचवड शहरातील आणि शहराबाहेरील पण शहरात उपचार सुरू आहेत अशा 84 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली. त्यापैकी 24 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. कोरोना बाधित सक्रिय 60 रुग्ण शहरात आहेत. त्यातील 48 रुग्णांवर महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये तर शहरातील नऊ रुग्णांवर महापालिका हद्दीबाहेरील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

महापालिका हद्दीबाहेरील तीन रुग्णांवर महापालिका रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर, रविवारी (दि.12) थेरगाव भागातील एका पुरुषाचा, सोमवारी (दि.20) निगडीतील एका महिलेचा आणि पुण्यातील रहिवाशी पण वायसीएममध्ये दाखल असलेल्या एका महिलेचा आणि शुक्रवारी (दि. 24)  निगडीतील एका पुरुष रुग्णाचा अशा चार जणांचा कोरोनामुळे आजपर्यंत मृत्यू झाला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.