Pimpri: विधानसभा निवडणुकीअगोदरच ‘परीक्षा’ संपणार; बहुतांश शिक्षकांना लागली निवडणूक ड्युटी

एमपीसी न्यूज – विधानसभा निवडणुकीसाठी बहुतांशी शिक्षकांना निवडणूक ड्युटी लागली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या पहिल्या शैक्षणिक सत्राची परीक्षा निवडणुकीच्या अगोदरच उरकण्यात येणार आहेत. दरम्यान, निवडणुकीमुळे महापालिका शाळांच्या सुट्टयांमध्येही वाढ करण्यात आली आहे. 20 ऑक्टोबरपासून महापालिका शाळांना सुट्टी देण्यात येणार आहे.

जून महिन्यात सुरू होणा-या शैक्षणिक वर्षातील पहिल्या सत्राचा समारोप ऑक्टोबर महिन्यामध्ये होतो. विद्यार्थ्यांच्या परीक्षा उरकून त्यांना सुट्टी देण्यात येते. यावर्षी दिवाळीपूर्वी निवडणूक येत असल्याने विद्यार्थ्यांची परीक्षा लकवर घेण्यात येत आहे. विधानसभा निवडणुकीची मतदान आणि मतमोजणी प्रक्रिया पार पाडण्यासाठी लागणा-या हजारो कर्मचा-यांमध्ये शिक्षकांचाही समावेश असतो.

निवडणूक कामासाठी 80 टक्के शिक्षकांची नेमणूक करण्यात आली असून त्यांचे पहिले व दुसरे प्रशिक्षणही आटोपले आहे. शिक्षण विभागाने येत्या 20 ऑक्टोबरपूर्वी विद्यार्थ्यांच्या परीक्षा आटोपण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार तोंडी परीक्षा आोटपल्या असून लेखी परीक्षांना सुरूवात झाली आहे.

यंदा 26 ऑक्टोबरपासून महापालिकेच्या शाळांना सुट्टी देण्यात येणार होती. मात्र, निवडणुकीसाठी शाळांचा वापर करण्यात येणार असल्याने त्यामध्ये बदल करण्यात आला आहे. विधानसभा निवडणुकीमुळे पहिले सत्र 19 ऑक्टोबर रोजी संपवण्यात येणार असून 20 ऑक्टोबरपासून महापालिका शाळांना सुट्टी देण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.