Pimpri: कोरोना नंतर पुढे जाताना…

Moving on after Corona ...

एमपीसी न्यूज – चीन पासून कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावाला सुरुवात झाली आणि पाहता पाहता तो सर्व जगभर पसरला. आपल्या देशात तो त्याचे स्वरूप वाढवत आहे. त्यामुळे प्रत्येक घटकाला म्हणजे उद्योग, व्यापार आणि सामान्य माणूस याला खूप त्रास आणि अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे.

कोरोना आहे आणि काही दिवसात तो जाईलही पण आपल्या सर्वांना म्हणजे सरकार सहित प्रशासन व नागरिक म्हणून पुढे भविष्यात काही बदल व उपाययोजना करायची गरज आहे.

आज आपला देश हा बलाढ्य लोकसंख्येचा देश आहे. पण, खरे पाहता अजूनही पूर्णपणे किंवा जास्त प्रमाणात आपल्याकडे   शिक्षण, सार्वजनिक आरोग्य ,रिसर्च अँड डेव्हलपमेंट,  नवीन सुधारणा आणि सामाजिक बांधिलकी याबाबत  साक्षरता नाही.

अजूनही अनेक ठिकाणी निरक्षरतेचे प्रमाण जिथल्या तिथे आहे. किंवा खूप संथ गतीने वाढत आहे. सर्व शिक्षा अभियान, शालेय पोषण आहार, किंवा प्रौढ वर्ग  यातून साक्षरतेचे प्रमाण वाढले. पण, आजच्या डिजिटल युगात म्हणा किंवा विकसनशील भारताला पूर्णपणे साक्षरतेची गरज आहे. साक्षरता वाढेल  तर, वैज्ञानिक विचाराला विरोध राहणार नाही.

या करोना काळात अशा अनेक गोष्टी आढळून आल्यात उदाहरणार्थ हात साबणाने 20 सेकंद धुवा. ते कशाप्रकारे धुवा हे सांगितले. पण, तेवढा वेळ काय धुवावेत. त्याने काय होणार आहे. मी तर हात धुतले आहेत. अशा अनेक गोष्टी आपणास पहावयास मिळाल्या.

मास्क लावा, असे वारंवार सांगून तेव्हा कुठे आता लोकं ते वापरू लागले आहेत. पण ते लावायची काढायची काही पद्धत असते किंवा समोर कोणी बोलल्यानंतर ते मास्क खाली करून बोलत आहे.

म्हणून यासाठी साक्षरतेचे, शिक्षणाचे प्रमाण हे वाढले पाहिजे जेणेकरून वैज्ञानिक दृष्टिकोनातून लोक विचार करतील आणि त्यांचे जीवनमान सुधारेल.

विखुरलेल्या समाजाला साक्षरतेकडे जोडणे हे आपल्या पुढील आव्हान आहे. कोरोनाच्या निमित्ताने सार्वजनिक आरोग्य हा विषय पुन्हा एकदा समोर आला आहे.

आज आपण देशात सार्वजनिक आरोग्य किंवा यंत्रणेचा विचार केला. तर आपण  खूप मागे आहोत. अनेक ठिकाणी खाटा (बेड )नाहीत. तर, खूप कमी प्रमाणात संसर्ग रोगाचे हॉस्पिटल्स आहेत. व्हेंटिलेटरचा तर प्रश्नच नाही.

आज अन्न,वस्त्र,निवारा याच सोबत खूप महत्वाचे आहे.   आरोग्य जपण्यासाठी व चांगले  ठेवण्याची जबाबदारी स्वतः आणि त्याचबरोबर कित्येक पटीने सरकारची देखील आहे.

आपण किती पैसे आरोग्य यंत्रणा यासाठी खर्च करतो? ते आता कमी पडत आहे का ? हा विचार करण्याची आज गरज भासत आहे. सार्वजनिक आरोग्यावर आणि त्या यंत्रणेवर सरकारने जास्त पैसा खर्च करावा ते महत्त्वाचे आहे. या कोरोना महामारीमुळे ते कळून चुकले आहे.

आरोग्य यंत्रणा सोबतच डॉक्टर ,नर्स, पॅरामेडिकल स्टाफ,कर्मचारी व यंत्रणेशी निगडित सर्वांना अपग्रेड करण( सुधारित गोष्टींची कल्पना देणे )हे देखील महत्त्वाचे आहे. तेव्हा   सरकारने प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या संख्या वाढविणे  आणि अद्यावत सुविधा देणे गरजेचे झाले आहे.

कोरोना  या महाभयानक रोगाला मारण्यासाठी औषध शोधण्यात अनेक देश प्रयत्न करत आहे. त्यात भारत सुद्धा आहे. पण अजून तरी त्यावर योग्य तोडगा नाही, आशा आहे तो निघेल.

पण आज भारतीयांना विचार करण्याची गरज आहे की आपण GDP च्या किंवा बजेटच्या किती प्रमाणात पैसा किंवा (पॅकेज )हे रिसर्च अँड डेव्हलपमेंट साठी खर्च करीत आहोत. तो पुरेसा आहे का? प्रगत किंवा विकसित देशाला ज्याप्रमाणे सीमा सुरक्षित ठेवावे लागतात.

त्याचप्रमाणे देशातील नागरिकांचे आरोग्य हे देखील चांगले ठेवावे लागते.  त्यासाठी औषधांमध्ये नाविन्यपूर्ण शोध (रिसर्च)अत्यंत महत्त्वाचा भाग आहे.

याबरोबर कोरोनाच्या संकटकाळात आपण एक गोष्ट विसरलोच. “भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत” मागच्या काही दिवसात आपण किती निर्दयी, स्वार्थी झालो याचे अनेक उदाहरण आहेत.

कोरोनाचा पेशंट आमच्या सोसायटीमध्ये नको आहे, तुम्ही covid-19 वॉड मध्ये काम करत असाल डॉक्टर, नर्स ,पोलीस तर तुम्ही दुसऱ्या ठिकाणी राहा अशा अनेक समाजविघातक आणि सामाजिक बांधिलकी नसलेल्या गोष्टी समोर आल्या.

देशाला शिक्षण, आरोग्य, रिसर्च याबरोबर आपल्याला माणुसकी, सामाजिक भान आणि सामाजिक बांधिलकी हे जपणे तेवढेच महत्त्वाचे आहे.  तेव्हा कोरोना नंतरच्या काळात याचा विचार आपण करू हे अपेक्षित.

गौरव चौधरी

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.