Pimpri : खासदार श्रीरंग बारणे म्हणजे देशाचं उदयोन्मुख नेतृत्व – गिरीश प्रभुणे

एमपीसी न्यूज – मावळ लोकसभा मतदारसंघातून सलग दुसऱ्यांदा विजयी होऊन देशाच्या संसदेत जनसामान्यांचे प्रतिनिधित्व करणारे खासदार श्रीरंग बारणे हे देशाचं उदयोन्मुख नेतृत्व आहे. घेतलेला विषय तडीस नेणे, दिलेला शब्द पाळणे, विषयाची व्याप्ती लक्षात घेऊन त्याचा पाठपुरावा करणे, या गुण कौशल्यांमुळे खासदार बारणे यांचा लौकिक आहे, असे मत चापेकर स्मारक समितीचे अध्यक्ष गिरीश प्रभुणे यांनी व्यक्त केले.

सलग दुसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आल्याबद्दल पिंपरी-चिंचवड शहर शिवसेना, महिला आघाडी आणि युवासेना यांच्या वतीने खासदार श्रीरंग बारणे यांचा जाहीर नागरी सत्कार करण्यात आला. याप्रसंगी गिरीश प्रभुणे बोलत होते.

  • यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते मधू जोशी, कामगार नेते मनोहर भिसे, आमदार गौतम चाबुकस्वार, जिल्हाध्यक्ष गजानन चिंचवडे, शहराध्यक्ष योगेश बाबर, मधुकर बाबर, उर्मिला काळभोर, सरिता साने, अनिता तूतारे, नगरसेवक सचिन भोसले, अश्‍विनी चिंचवडे, राजेश वाबळे, शिवसेना, महिला आघाडी आणि युवा सेनेचे सर्व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

गिरीश प्रभुणे म्हणाले, मावळ मतदारसंघातील एखादा व्यक्ती एखादं काम घेऊन खासदार बारणे यांच्याकडे गेला आणि ते झालं नाही, असं होत नाही. नागरिकांनी मांडलेला प्रत्येक विषय त्यांच्या लवकर लक्षात येतो. त्या विषयाची व्याप्ती लक्षात घेत त्या विषयाला तडीस नेण्यासाठी बारणे सातत्याने प्रयत्नशील राहतात. क्रांतिकारकांच्या जन्मगावी तयार होत असलेलं भारतातील पहिले स्मारक म्हणून चापेकर स्मारकाची ओळख बारणे यांच्या प्रयत्नामुळे झाली. बारणे यांनी जनतेला दिलेला प्रत्येक शब्द पाळला आहे. त्यांची विषय मांडण्याची अभ्यासपूर्ण शैली संपूर्ण सभागृहाला मोहून टाकणारी आहे.

  • भाजपचे ज्येष्ठ नेते मधू जोशी म्हणाले, पिंपरी चिंचवड शहरात अतिशय प्रतिकूल काळात शिवसेना वाढली. शिवसेनेच्या प्रत्येक कार्यकर्त्यांमध्ये जिद्द आणि चिकाटी आहे. शिवसेनेचे पदाधिकारी राजकीय कामापेक्षा जनतेच्या कामाला सतत प्राथमिकता देतात. अशा पक्षाची ताकद भाजपला लाभली असल्यामुळे युतीची ताकद दुप्पट नसून ती दहापट वाढली आहे. बारणे यांच्या कामाची इच्छा मावळ लोकसभा मतदारसंघासह देशाच्या संसदेत देखील चांगली आहे. मतदारसंघातील नागरिकांनी शासनाच्या वेगवेगळ्या योजनांचा लाभ घेण्यासाठी बारणे यांच्याकडे जायला हवे, असेही ते म्हणाले.

कामगार नेते मनोहर भिसे म्हणाले, श्रीरंग बारणे म्हणजे जिद्दीचा महामेरू आहेत. त्यांनी घेतलेले प्रत्येक काम तडीस नेले आहे. महायुतीची पावर पवारांवर भारी पडली आहे. बारणे यावेळी देखील मोठ्या प्रमाणात विकासकामे करतील, असा विश्वास देखील भिसे यांनी व्यक्त केला.

  • आमदार गौतम चाबुकस्वार म्हणाले, खासदार श्रीरंग बारणे यांनी मागील पाच वर्षात मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात काम केले आहे. या कामामुळे त्यांना यावेळी देखील निवडून येण्याचा आत्मविश्वास होता. मावळ मतदारसंघात झालेल्या मतदानाची चर्चा दिल्लीत देखील झाली. बारणे यांनी उत्तम प्रकारे काम करत लोकसंपर्क वाढवला. त्यामुळे मावळच्या जनतेने पुन्हा एकदा त्यांना नेतृत्व दिले आहे.

सत्काराला उत्तर देताना खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, मी शिवसेना, भाजप, रासप, आरपीआय (अ), रयत क्रांती संघटना, शिवसंग्राम महायुतीचा खासदार आहे. जेवढे परिश्रम शिवसेना पक्षाने घेतले, तेवढेच किंबहुना त्यापेक्षा दोन पावले पुढे जाऊन महायुतीमधील अन्य घटक पक्षांनी काम केले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे देखील यामध्ये मोठे योगदान आहे. हा माझा विजय नसून हा मावळच्या प्रत्येक मावळ्याचा विजय आहे. महायुतीमधील सर्व घटक पक्षातील सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी आणि जनता या विजयाचे शिल्पकार आहेत.

  • मी मागील पाच वर्षात मावळ लोकसभा मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचलो होतो. त्यांची कामे केली होती. अनेक विषय देशाच्या संसदेत मांडले होते. त्यामुळे मी निवडून येणार हा माझ्यापेक्षा अधिक जनतेला आत्मविश्वास होता. देशाच्या संसदेत पुन्हा एकदा काम करण्याची संधी दिली, हाच माझा मावळच्या जनतेने केलेला सर्वात मोठा बहुमान आहे. यापुढील काळात देखील सर्वसामान्य नागरिकाला न्याय देण्याचे काम आपण सर्वजण मिळून करू. असा सल्ला देखील बारणे यांनी उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिला.

कार्यक्रमाचे संयोजन जिल्हाप्रमुख गजानन चिंचवड, जिल्हा संघटिका शादान चौधरी, शहरप्रमुख योगेश बाबर, शहर संघटिका उर्मिला काळभोर, तालुका प्रमुख राजू खांडभोर, पिंपरी विधानसभा प्रमुख नगरसेवक प्रमोद कुटे, चिंचवड विधानसभा प्रमुख अनंत को-हाळे, विधानसभा संघटिका सरिता साने, अनिता तुतारे, शैला खंडागळे, राजेश वाबळे, धनाजी बारणे आदींनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.