Pimpri: खासदार बारणे यांची औंध, पनवेल जिल्हा रुग्णालयाला वैद्यकीय साहित्य खरेदीसाठी 50 लाखांची मदत

कोरोना विरोधातील लढाईसाठी दिले एक कोटीचा निधी  

एमपीसी न्यूज – कोरोनाला रोखण्यासाठी राज्य सरकारने विशेष रुग्णालये म्हणून घोषित केलेल्या सांगवीतील औंध ऊरो जिल्हा रुग्णालय आणि पनवेल उपजिल्हा रुग्णालयाकरिता वैद्यकीय साहित्य खरेदीसाठी शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी 50 लाख रुपयांचा खासदार निधी दिला आहे.  या दोनही रुग्णालयात कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार करणे बंधनकारक केले आहे. दरम्यान, बारणे यांनी  यापूर्वी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला 50 लाखांचा निधी दिला आहे. कोरोना विरोधातील लढाईसाठी बारणे यांनी एक कोटीचा खासदार निधी उपलब्ध करुन दिला आहे.

मावळचे खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, ‘राज्य सरकारने कोरोना संशयित, कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी माझ्या मतदारसंघातील दोन रुग्णालये विशेष रुग्णालये म्हणून घोषित केली आहेत.  सांगवीतील औंध ऊरो जिल्हा रुग्णालय (50 खाटा) आणि रायगड जिल्ह्यातील पनवेल उपजिल्हा रुग्णालयांना (100 खाटा) कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करणे बंधनकारक  केले आहे. त्यानंतर तत्काळ मी या दोनही रुग्णालयातील प्रमुखांशी चर्चा केली’.

कोरोना विरोधातील लढाईसाठी आणखी वैद्यकीय उपकरणांची आवश्यकता असल्याचे त्यांनी माझ्या निदर्शनास आणून दिले. या रुग्णालयातील कोरोनाग्रस्त रुग्णांवर दर्जेदार उपचार करण्यासाठी व्हेंटिलेटर, मल्टीपॅरा मॉनिटर, इन्फ्युझन पंप यासह इतर वैद्यकीय साहित्य खरेदीसाठी 50 लाख रुपयांचा खासदार निधी दिला आहे. त्यामध्ये सांगवीतील जिल्हा रुग्णालयासाठी 25 लाख आणि पनवेल येथील उपजिल्हा रुग्णालयासाठी 25 लाख असा 50 लाखांचा खासदार निधी उपलब्ध करुन दिला आहे, असे बारणे यांनी सांगितले.  याबाबत पुण्याचे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम आणि रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांना पत्र पाठवून तत्काळ निधी उपलब्ध करुन देण्याची सूचना बारणे यांनी केली आहे.

कोरोना विरोधातील लढाईसाठी सर्वजण एकत्र येत आहेत. ही आनंदाची गोष्ट आहे. सर्वांच्या एकतेच्या बळावर आपण कोरोनाला हरवू शकतो, असा विश्वासही खासदार बारणे यांनी व्यक्त केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.