Pimpri: ‘कोरोना व्हायरस’च्या खबरदारीबाबत महापालिका प्रशासन उदासीन, भाजप नगरसेवकाचा आरोप

एमपीसी न्यूज – ‘कोरोना व्हायर’सने चीनमध्ये हडकंप घातला आहे. त्यापार्श्वभूमीवर पिंपरी महापालिकेच्या ‘वायसीएमएच’ रुग्णालयामध्ये स्वतंत्र कक्ष सुरु करण्याची मागणी करुन देखील महापालिकेकडून त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. ‘कोरोना व्हायरस’च्या खबरदारीबाबत महापालिका प्रशासन उदासीन का आहे? असा सवाल सत्ताधारी भाजपचे नगरसेवक संदीप वाघेरे यांनी केला आहे.

‘कोरोना व्हायरस’ने अनेक देशांमध्ये धुमाकूळ घालत आहे. भारतात देखील हा व्हायरस दाखल होण्याची शक्यता आहे. त्याबाबतची भिती व्यक्त केली जात आहे. पिंपरी-चिंचवड शहरात असंख्य नागरिक बाहेरून दाखल होत असतात. त्यापार्श्वभुमीवर खबरदारीची उपाययोजना म्हणून महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयामध्ये नवीन कोरोना विषाणू रुग्णासाठी स्वतंत्र कक्ष तत्काळ स्थापन करावा.

तसेच आरोग्य व वैद्यकीय विभागामार्फत या विषाणूचा प्रादुर्भाव प्रतिबंध व नियंत्रणासाठी योग्य त्या उपाययोजना त्वरित राबविण्याची विनंती केली होती. परंतु, प्रशासनाच्या वतीने कोणतीही पाऊले उचलली नाहीत. ही खेदाची बाब आहे, असे वाघेरे यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.