Pimpri: महापालिका आयुक्तांकडून नगरसचिवांना खडेबोल; आरोग्य वैद्यकीय अधिकाऱ्यांना समज

Municipal Commissioner slaps Municipal Secretary; Understanding health medical officers : यांत्रिकी पद्धतीने रस्ते साफसफाई निविदा प्रकरण

एमपीसी न्यूज – व्यापक शहर हिताचे प्रश्न सभागृह पटलावर आणण्यापूर्वी ते अपवादात्मक स्थिती नसताना ऐनवेळचे विषय म्हणून दाखल होणार नाहीत याची दक्षता घेण्याचे निर्देश आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी  नगरसचिवांना दिले आहेत. तर, महत्वाच्या निविदा करताना त्याचे विषयपत्र, ठराव सभागृहासमोर आणताना योग्य ती खबरदारी घेण्याची समज आरोग्य वैद्यकीय अधिका-यांना दिली आहे.

बेकायदेशीरपणे यांत्रिकी पद्धतीने रस्ते साफसफाईची निविदा प्रक्रिया केल्याने ती रद्द करण्याची नामुष्की आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्यावर ओढाविली आहे. कोणतीही तातडीची बाब नसताना यांत्रिकीकरणाच्या विषयाला आयत्यावेळी मान्यता दिली होती.

त्यामुळे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी नगरसचिव उल्हास जगताप यांना निर्देश दिले आहेत. विविध सभा कामकाजासंदर्भात नियमावली अधिक स्पष्ट व कायद्यावर आधारित अशी करुन त्याला विधीवत विधी, सर्वसाधारण सभेची मान्यता घ्यावी.

कामजाकातील त्रुटी राहणार नाहीत, याची दक्षता घ्यावी. व्यापक समाज हिताचे प्रश्न सभागृह पटलावर आणण्यापूर्वी ते अपवादात्मक स्थिती नसताना ऐनवेळचे विषय म्हणून दाखल होणार नाहीत, याची दक्षता घ्यावी.

प्रशासनाकडून दाखल झालेले विषय आयुक्तांच्या पत्राशिवाय ऐनवेळचे विषय म्हणून दाखल करुन घेण्यात येवू नयेत याची खबरदारी घ्यावी, असे निर्देश आयुक्तांनी नगरसचिवांना दिले आहेत.

तर, आरोग्य विभाग आणि विभागाचे प्रमुख आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के. अनिल रॉय यांना समज देण्यात आली आहे. महत्वाच्या निविदा करताना व त्याचे विषयपत्र आणि ठराव सभागृहासमोर आणतांना योग्य ती खबरदारी घ्यावी.

त्यानंतरच संपूर्ण निविदा प्रक्रिया रद्द होऊन भविष्यातील कालापव्य होणार नाही, याची खबरदारी घ्यावी, असे आयुक्तांनी डॉ. रॉय यांना सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like