Pimpri: महापालिका आयुक्तांची त्वरीत बदली करा; शिवसेना जिल्हाप्रमुखाची मागणी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांची आजपर्यंतची वाटचाल ही निष्क्रिय व बोटचेपी धोरणाची राहिली आहे. सत्ताधारी भाजपला अनुकूल आहेत. त्यांच्यामुळे शहराचे व शहरवासीयांचे कधीही न भरून येणारे नुकसान झाले आहे. त्यामुळे आयुक्तांची तत्काळ बदली करण्यात यावी, अशी मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

पिंपरी-चिंचवड शहर हे जगाच्या नकाशावर एक वेगळी ओळख निर्माण केलेले विकसनशील शहर आहे. महापालिकेच्या आयुक्तपदी श्रावण हर्डीकर यांनी एप्रिल 2017 ला कार्यभार स्वीकारल्यानंतर एक कुशल प्रशासक म्हणून जबाबदारी बजावून प्रशासनात शिस्त आणून लोकभिमुख निर्णय घेणे अपेक्षित होते. परंतु, आयुक्तांची आजपर्यंतची वाटचाल ही निष्क्रिय व बोटचेपी धोरणाची राहिल्यामुळे शहराचे व शहरवासियांचे कधीही न भरून येणारे नुकसान झाले आहे.

संशयास्पद व वादग्रस्त कचरा निविदा प्रक्रिया, केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत सर्वेक्षणामध्ये महापालिकेची घसरण, 24 × 7 पाणीपुरवठा योजनेचे तीन तेरा, धरणक्षेत्रात मुबलक पाणीसाठा असताना देखील वारंवार पाणी कपातीचे धोरण, अनेक संशयास्पद निविदाप्रकीया, विकास कामे व ठेकेदारांना मुदतवाढ, वायसीएमएचच्या वैद्यकीय सेवेचा बोजवारा, खातेनिहाय चौकशीतून निर्दोष मुक्तता विविध विभागातील वर्षानुवर्ष ठाण मांडून बसलेल्या अधिकाऱ्यांना अभय, नागरी हिताच्या सारथी हेल्पलाईन कडे दुर्लक्ष, हॉकर्स झोन धोरण अंमलबजावणीत अपयश, विरोधी पक्षाच्या नगरसेवकांना दुजाभावाची वागणूक, राजशिष्टाचार न पाळणे यामुळे त्यांना सत्ताधारी पक्षाचे घरगडी, दलाल, प्रवक्ते असे संबोधले जाऊ लागले. तरीदेखील त्यांच्या कामामध्ये कुठलीही सुधारणा झाली नाही.

भविष्यकाळात पिंपरी-चिंचवड शहरास एक गतिमान विकसित शहर म्हणून पुढे न्यायचे झाल्यास आयुक्तांची बदली होणे ही काळाची गरज आहे. त्यामुळे या निष्क्रिय आयुक्तांची त्वरीत बदली करावी, अशी विनंती चिंचवडे यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.