Pimpri: कोरोनाचा पार्श्वभूमीवर महापालिकेची शुक्रवारी होणारी सर्वसाधारण रद्द 

एमपीसी न्यूज – कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड महापालिकेची मार्च महिन्याची शुक्रवारी (दि.20) होणारी सर्वसाधारण सभा रद्द करण्यात आली असल्याचे सभागृह नेते नामदेव ढाके यांनी सांगितले. तसेच स्थायी समितीसह विविध विषय समित्यांच्या सभा देखील रद्द केल्या जातील.

राज्यात कोरोनाचे जेवढे रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी सर्वाधिक रुग्ण पिंपरी-चिंचवडमध्ये शहरात आढळले आहेत. शहरात दहा पॉझिटीव्ह रुग्ण आहेत. त्यापार्श्वभूमीवर नागरिकांसाठी महापालिकेत प्रवेश देखील बंद केला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून गर्दी होणाऱ्या ठिकाणांवर प्रतिबंध घातले आहेत. शाळा, कॉलेज, थिएटर, जलतरण तलाव, व्यायामशाळा, नाट्यगृहे बंद करण्यात आले. त्यानंतर महापालिकेनेही सार्वजनिक उद्याने बंद केली आहेत. तसेच, सर्व सार्वजनिक व खासगी कार्यक्रम व गर्दीचे उपक्रम रद्द करण्यात आलेले आहेत.

या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड महापालिकेची मार्च महिन्याची शुक्रवारी (दि. 20) होणारी महासभा रद्द करण्यात आली आहे. सर्वसाधारण सभेला 133 नगरसेवक व सुमारे 50 हून अधिक अधिकारी वर्ग उपस्थित असतात. तसेच, महापालिका स्थायी समितीसह, विषय समित्यांच्या बैठकाही तूर्तास टाळण्याचा विचार सुरू आहे.

दरम्यान, पिंपरी-चिंचवड महापालिकेचा आगामी 2020-21 या आर्थिक वर्षाचा आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी मांडलेला अर्थसंकल्प स्थायी समितीने मंजूर केला. परंतु,  स्थायी समिती सभापती निवडीमुळे महापालिकेची अर्थसंकल्पीय सभा अद्याप झालेली नाही. अर्थसंकल्पाच्या मंजुरीसाठी विशेष सभा घेणे अपेक्षित आहे. मात्र, सर्वसाधारण सभा रद्द केल्यामुळे आता महापालिकेची अर्थसंकल्पीय सभा देखील होणार नाही. ती लांबणीवर गेली अूसन अर्थसंकल्पाच्या मंजुरीला आणखी विलंब होणार आहे. 31 मार्चपर्यंत महासभेची मान्यता न घेतल्यास आयुक्तांच्या अर्थसंकल्पाची अमंलबजावणी केली जाईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.