Pimpri: महापालिकेने झोपडपट्टीधारकांच्या बँक खात्यात दोन हजार रुपये जमा करावेत – सुलभा उबाळे
एमपीसी न्यूज – कोरोना विषाणूमुळे पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व गोरगरीब, हातावर पोट असणाऱ्या विशेषतः झोपडपट्टीमधील नागरिकांचा रोजगार बंद झाला आहे. त्यामुळे या नागरिकांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यासाठी महापालिकेने झोपडपट्टी धारकांच्या बँकेतील जनधन खात्यात प्रत्येकी दोन हजार रुपये जमा करावेत, अशी मागणी शिवसेनेच्या शिरुर महिला जिल्हा संघटिका सुलभा उबाळे यांनी केली आहे.
याबाबत उबाळे यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात म्हटले आहे की, शहरात झोपडपट्यांची संख्या मोठी आहे. झोपडपट्टीतील नागरिकांचे हातावरचे पोट आहे. काम केले तरच त्यांना रोजगार मिळतो. लॉकडाऊनमुळे सर्व बंद आहे. त्यांच्या हाताला काम नाही. त्यामुळे त्यांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
गरजू नागरिकांना मदत करण्यासाठी नगरसेवकांकडे पाच लाख रुपयांचे धान्य देण्यात यावे, असे काही जण सूचवत आहेत. पण त्यात राजकारण आडवे येऊ शकते आणि खऱ्या गरिबाला धान्य न मिळण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे विशेष बाब म्हणून आपल्या अधिकारात सर्व झोपडपट्टीधारकांच्या बँकेतील जनधन खात्यात प्रत्येकी दोन हजार रुपये जमा करावेत. जेणेकरून त्यांना लागणाऱ्या वस्तू खरेदी करता येतील, अशी विनंती उबाळे यांनी केली आहे.