BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri: महापालिका 19 पुरवठादारांकडून साडेसोळा कोटींची औषधे खरेदी करणार; स्थायीची मान्यता

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेचे दवाखाने, रूग्णालयांसाठी आवश्यक असणारी औषधे खरेदी 19 पुरवठादारांकडून केली जाणार आहे. 683 प्रकारची ही विविध औषधे खरेदीसाठी सुमारे 16 कोटी 50 लाख रूपये इतका खर्च होणार आहे. याबाबतच्या खर्चाला आज (शुक्रवारी) झालेल्या स्थायी समिती सभेत मान्यता देण्यात आली.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीची 10 जुलैची तहकूब सभा आज पार पडली. सभापती विलास मडिगेरी सभेच्या अध्यक्षस्थानी होते.

  • महापालिकेचे दवाखाने, रूग्णालयांसाठी आवश्यक असणारी औषधे, साहित्य खरेदीसाठी दोन वर्षे कालावधीकरिता निविदा प्रक्रीया राबवून दर मागविण्यात आले आहेत. या निविदेतील अ‍ॅलोपॅथी औषधांचे 690 बाबींसाठी दर प्राप्त झाले. त्यापैकी 391 बाबींसाठी निविदा दरापेक्षा कमी तर 299 बाबींसाठी निविदा दरापेक्षा जास्त दर प्राप्त झाले. 144 औषधांसाठी तर एकच निविदा आली. 113 बाबींसाठी दोन तर 433 औषधांसाठी तीनपेक्षा जास्त पुरवठादारांनी दर सादर केले.

औषध निवड समितीने प्राप्त निविदा, औषध खरेदी संदर्भातील कंपन्या, त्यांची विविध आजारावरील औषधे, त्यापैकी जीवनरक्षक औषधे, त्यांचे बाजारभावानुसार निविदेत प्राप्त झालेले दर, त्यांचे मूळ अंदाजपत्रकातील कमी किंवा जास्त दर विचारात घेतले. त्यानुसार 19 निविदा धारकांचे 391 औषधांसाठी अंदाजपत्रकीय दरापेक्षा कमी दर प्राप्त झाले आहेत. त्यामुळे एकच किंवा दोन, तीन अथवा त्यापेक्षा जास्त याप्रमाणे निविदा धारकांच्या प्राप्त झालेल्या दरानुसार सर्व निविदा स्वीकारण्यात याव्यात.

  • 299 औषधांचे दर हे अंदाजपत्रकीय दरापेक्षा जास्त प्राप्त झाले असले तरी जीएसटीमुळे झालेले बदल, बाजारातील औषधांच्या विविध कंपन्या, मागील तीन वर्षातील भाववाढ तसेच महापालिकेची औषधांची, जीवनरक्षक औषधांची गरज आणि महापालिकेचे दवाखाने, रूग्णालयातील औषधांचा तुटवडा या बाबी विचारात घेऊन 299 बाबींपैकी 10 टक्क्यांपर्यंत असणारे सर्व 75 औषधे, 10 टक्क्यांपेक्षा जास्त दर असलेल्या 224 औषधांपैकी सात औषधांच्या बाबी वगळता उर्वरीत 217 औषधांचे निविदा दर स्वीकृत करावेत, अशी शिफारस समितीने केली आहे.

औषध निवड समितीने केलेल्या शिफारशीनुसार, 690 औषधांच्या बाबींपैकी 683 बाबींची औषधे खरेदीसाठी 16 कोटी 49 लाख 60 हजार रूपये दर प्राप्त झाला आहे. हा दर अर्थसंकल्पीय 17 कोटी 2 लाख रूपये या दरापेक्षा 3.12 टक्क्यांनी कमी आहे. हे दर जीएसटी वगळून प्राप्त झाले आहेत. त्यानुसार 19 निविदा धारकांसोबत प्राप्त लघुत्तम दरानुसार अधिक जीएसटी कर याप्रमाणे दोन वर्षे कालावधीसाठी औषध खरेदीसाठी करारनामा करण्यास आणि प्रत्यक्ष खरेदी खर्चास स्थायी समितीने मान्यता दिली आहे.

Advertisement

HB_POST_END_FTR-A3