Pimpri: महापालिका बालनगरीत 425 तर ऑटो क्लस्टर येथे 250 ऑक्सिजनयुक्त बेडची निर्मिती करणार

Pimpri: Municipal Corporation to provide 425 oxygen beds in Balnagar and 250 in Auto Cluster 15 ऑगस्टपर्यंत शहरातील रुग्णसंख्या 50 हजार होईल असा प्रशासनाचा अंदाज आहे.

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचे रूग्ण दिवसेंदिवस वाढत असल्याने महापालिका जम्बो सुविधा निर्माण करत आहे. भोसरी गवळीमाथा येथील बालनगरीच्या इमारतीमध्ये 425 बेडची निर्मिती केली जाणार असून त्यातील 80 टक्के ऑक्सिजन बेड असणार आहेत. तर, चिंचवड येथील ऑटो क्लस्टर येथे आयसीयू आणि ऑक्सिजन बेड तयार केले जात आहेत. तेथे 250 बेडची क्षमता असणार आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जम्बो सुविधा करण्याच्या सूचना पालिकेला दिल्या आहेत. शहरात कोरोनाचा कहर सुरू आहे. रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. दिवसाला एक हजारहून अधिक जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह येत आहेत.

15 ऑगस्टपर्यंत शहरातील रुग्णसंख्या 50 हजार होईल असा प्रशासनाचा अंदाज आहे. वाढत्या रुग्णसंख्येचा अंदाज घेऊन प्रशासनाकडून उपाययोजना हाती घेतल्या आहेत.

कोरोना रूग्णांवर महापालिकेच्या वायसीएम रूग्णालय, भोसरी रूग्णालय तसेच बालेवाडी क्रीडा संकुलात उपचार केले जातात. याशिवाय संशयित रूग्णांसाठीही महापालिकेने काही ठिकाणी क्वारंटाइन सेंटर उभारली आहेत.

वाढत्या रुग्णसंख्येत श्वासनाचा त्रास होत असलेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे. त्यामुळे पालिकेने ऑक्सिजन युक्त बेडची निर्मिती करण्यावर भर दिला आहे.

याबाबत आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, ”वाढती रुग्णसंख्या पाहता महापालिकेच्या ‘क’ क्षेत्रीय कार्यालय हद्दीत भोसरी गवळीमाथा येथील एमआयडीसीच्या भुखंडावर महापालिकेने बालनगरी ही इमारत उभारली आहे.

कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता भोसरीतील बालनगरीत 425 बेडची निर्मिती करत आहोत. त्यात 80 टक्के ऑक्सिजन बेड असतील. ते 5 ऑगस्टपर्यंत तयार होईल. तर, चिंचवड येथील ऑटो क्लस्टर येथे आयसीयू आणि ऑक्सिजन बेड तयार करत आहोत. तेथे 250 बेडची क्षमता असणार असून 15 ऑगस्टपर्यंत कार्यान्वीत होईल”.

शहरातील रुग्णांसाठी पुण्यातही केली जात आहे सोय!
पुणे जिल्ह्यातील रुग्णांसाठी राज्य सरकार, पुणे, पिंपरी-चिंचवड पालिका, पीएमआरडीए आणि जिल्हाधिकारी कार्यालय एकत्रितपणे शिवाजीनगर येथील इंजिनिअरिंग कॉलेज (सीओपी) च्या मैदानावर एकत्रितपणे उपाययोजना करत आहे.

ऑक्सिजन, आयसीयू बेडची सुविधा असलेल्या 1 हजार बेडची निर्मिती या ठिकाणी केले जाणार आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील काही रुग्णांवर तिथे देखील उपचार केले जाणार आहेत. ही सुविधा संपूर्ण पुणे जिल्ह्यातील रुग्णांसाठी असणार आहे, असेही आयुक्त हर्डीकर यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.