Pimpri: महापालिका 28 लाखांची किटकनाशक औषधे खरेदी करणार

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका आरोग्य विभागासाठी आवश्यक विविध प्रकारची जंतुनाशक किंवा किटकनाशक औषधे खरेदी करण्यात येणार आहेत. त्यासाठी सुमारे 28 लाख 48 हजार रुपये खर्च येणार आहे.

पिंपरी-चिंचवड शहरामध्ये डासांना प्रादुर्भाव वाढला आहे. त्याचप्रमाणे शहरात ठिक-ठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरून अस्वच्छता पसरली आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यावर उपाययोजना करण्यासाठी अर्थात शहरामध्ये औषध फवारणी करणे गरजेचे आहे. त्यासाठी महापालिका आरोग्य विभागाला जंतूनाशक अर्थात किटकनाशक औषधांची गरज आहे. या विभागाने त्यानुसार विविध प्रकारच्या औषधांची मागणी केली आहे.

त्यानुसार महापालिका मध्यवर्ती भांडार विभागातर्फे औषध खरेदीसाठी ऑनलाईन निविदा मागविली. त्यावर प्राप्त झालेल्या निविदांमध्ये सर्वात लघुत्तम दराची निविदा मेसर्स डॉल्फीन सेल्स कार्पोरेशन, मेसर्स डॅप्मन्स पेस्ट कंट्रोल अलाईड सर्व्हीसेस आणि मेसर्स प्रोटेक्टस या तिन ठेकेदार कंपन्यांतर्फे सादर करण्यात आल्या. या तिनही कंपन्यांनी महापालिकेने सादर केलेल्या 29 लाख 20 हजार 750 या अंदाजपत्रकीय दरापेक्षा सरासरी 2.48 कमी दराच्या निविदा सादर केल्या.

महापालिका आरोग्य विभागासाठी आवश्यक जंतुनाशक औषधांपैकी बाब क्रमांक 3, 6, 8, 9 व 10 ची औषधे डॉल्फीन सेल्स यांनी 13 लाख 23 हजार 600 रुपये, बाब क्रमांक 4 ची औषधे डॅप्मन्स पेस्ट कंट्रोल अलाईड सर्व्हीसेस यांनी 1 लाख 49 हजार 270 रुपये, तर बाब क्रमांक 5, 7 व 8 ची जंतुनाशक औषधे प्रोटेक्टस यांनी 13 लाख 75 हजार 200 रुपयांमध्ये देण्याचे मान्य केले आहे.

या सर्वांसाठी महापालिकेला 28 लाख 48 हजार 70 रुपये खर्च येणार आहे. त्यामुळे या तिन्ही कंपन्यांकडून महापालिका आरोग्य विभागासाठी आवश्यक विविध प्रकारची जंतुनाशक किंवा किटकनाशक औषधे खरेदी करण्यात येणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.