Pimpri: एका श्वानाच्या संतती नियमनासाठी महापालिका मोजणार 999 रुपये!; स्थायी समितीने प्रस्तावाला दिली मान्यता

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील मोकाट आणि भटक्या कुत्र्यांची संख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी त्यांच्यावर संतती नियमनाची शस्त्रक्रिया केली जाणार आहे. प्रति श्वान 999 रुपये दराप्रमाणे 28 हजार श्वानांच्या संतती नियमन शस्त्रक्रियेसाठी अंदाजे 2 कोटी 70 लाख रुपये खर्च येणार आहे. त्यासाठी चार संस्थांची नेमणूक करण्यात आली आहे. याबाबतच्या प्रस्तावाला स्थायी समितीने आयत्यावेळी मान्यता दिली आहे.

महापालिका हद्दीतील मोकाट आणि भटक्या कुत्र्यांची संख्या नियंत्रित ठेवण्यासाठी केंद्र सरकारतर्फे 4 डिसेंबर 2009 रोजी मार्गदर्शक सुचना जारी करण्यात आल्या. त्यानुसार पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील कुत्र्यांच्या नियंत्रणासाठी या क्षेत्रात काम करणा-या, तसेच अ‍ॅनिमल वेल्फअर बोर्ड ऑफ इंडिया, चेन्नई यांच्याकडे नोंदणी असलेल्या स्वयंसेवी संस्थाच्या सहकार्याने श्वान संतती नियंत्रण शस्त्रक्रिया राबविण्याचे धोरण निश्चित करण्यात आले आहे. हा पशुजन्म नियंत्रण कार्यक्रम राबविण्यासाठी शहरात क्षेत्रिय कार्यालयनिहाय श्वान संतती नियमन व शस्त्रक्रिया केंद्र स्थापन करण्यात येणार आहे.

_MPC_DIR_MPU_II

त्यादृष्टीने ऑगस्ट 2019 मध्ये ई – निविदा प्रसिद्ध करण्यात आली. त्यानुसार प्राप्त झालेल्या निविदांचे दरपत्रक 11 सप्टेंबर 2019 रोजी उघडण्यात आले. ज्यामध्ये भाग घेतलेल्या तीन संस्था पात्र ठरल्या. नवी मुंबई येथील मेसर्स अ‍ॅनिमल वेल्फेअर असोशिएशन या संस्थेने प्रति श्वान 999 रुपये, उदगीर – लातूर येथील सोसायटी फॉर दि प्रिव्हेशन ऑफ क्रुएल्टी टू अ‍ॅनिमल संस्थेने 1001 रुपये, तर पाचगणी – सातारा येथील मेसर्स जेनी स्मीथ अ‍ॅनिमल वेल्फेअर ट्रस्ट या संस्थेने प्रति श्वान 1032 रुपये असा दर सादर केला. त्यामुळे शासन निर्णयानुसार उदगीर-लातूर आणि पाचगणी-सातारा येथील दोन्ही संस्थांनी दर कमी करण्याबाबत विचारणा करण्यात आली. त्यावर या दोन्ही संस्थांनी प्रति श्वान 999 रुपये दराने कामकाज करण्यास संमती दर्शविली आहे.

त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील मोकाट आणि भटक्या कुत्र्यांच्या संतती नियमन शस्त्रक्रियेसाठी नवी मुंबईच्या अ‍ॅनिमल वेल्फेअर असोशिएशन, उद्गीर-लातूरच्या सोसायटी फॉर दी प्रिव्हेन्शन टू अ‍ॅनिमल्स आणि पाचगणी-सातारा येथील जेनी स्मीथ अ‍ॅनिमल वेल्फेअर ट्रस्ट या तिन्ही संस्थांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यासाठी प्रति श्वान 999 रुपये दर ठरविण्यात आला असून पिंपरी-चिंचवड शहरातील अंदाजे 21 हजार मोकाट आणि भटक्या कुत्र्यांच्या संतती नियमानासाठी 2 कोटी 9 लाख 79 हजार रुपये इतका खर्च येणार आहे.

याखेरिज,मेसर्स जीवरक्षा अ‍ॅनिमल वेलफेअर ट्रस्ट (पुणे) या अतिक्ति अशासकीय संस्थेची याच कामासाठी नेमणूक करण्यास आणि त्यांना 70 लाख रुपये अदा करण्यास स्थायी समितीने मान्यता दिली. या संस्थेमार्फत सुमारे 7 हजार कुत्र्यांची निर्बीजीकरण शस्त्रक्रीया केली जाणार आहे. शहरातील भटकी, मोकाट कुत्री (नर किंवा मादी) पकडणे, त्यांच्यावर संतती नियमनाची शस्त्रक्रिया करणे, रेबीज प्रतिबंधक लसीकरण करणे, अशा कुत्र्यांना सांभाळणे, खावटी पाणी देणे, डॉग कॅनल्सची स्वच्छता ठेवणे आणि शस्त्रकियेनंतर त्यांना पुन्हा मूळ जागी नेवून सोडणे आदी कामांचा समावेश आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.