Pimpri: पीएमपीएमएलला 480 बसगाड्या खरेदीसाठी महापालिका देणार 237 कोटी

एमपीसी न्यूज – पीएमपीएमएलसाठी 1200 सीएनजी, बीआरटी आणि इलेक्ट्रीक बस खरेदी करण्यात येणार आहेत. त्यासाठी 40 टक्के हिश्श्याप्रमाणे पिंपरी-चिंचवड महापालिका पीएमपीएमपीएलला 237 कोटी रुपये इतकी रक्कम देणार आहे. आज (सोमवारी) झालेल्या महासभेत उपसुचनेद्वारे या विषयाला मान्यता देण्यात आली.

पुणे महानगर परिवहन महामंडळासाठी (पीएमपीएमएल) 1200 सीएनजी, बीआरटी आणि इलेक्ट्रीक बस खरेदी करण्यात येणार आहेत. त्यासाठी पीएमपीएमएल संचालक मंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. त्या अनुषंगाने बस खरेदीसाठी निविदा मागविण्यात आल्या. या निविदा प्रक्रीयेत सहभाग घेवून टाटा मोटर्स कंपनीने प्रति बस 48 लाख 40 हजार रूपये इतका दर सादर केला आहे. 40 टक्के हिश्श्याप्रमाणे 160 बससाठी प्रति बस 48 लाख 40 हजार नुसार, 77 कोटी 44 लाख रूपये इतकी रक्कम पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे पीएमपीएमएलला द्यावी लागणार आहे.

  • या व्यतिरिक्त आणखी 800 बस खरेदी करण्यात येणार आहेत. त्यामध्ये 9 मीटर लांबीच्या 25 , तर 12 मीटर लांबीच्या 125 अशा 150 बसेस आहेत. 40 टक्के हिश्श्याप्रमाणे पिंपरी-चिंचवड महापालिकेला प्रति बस 50 लाख रुपये प्रमाणे 60 बस खरेदीसाठी 30 कोटी रुपये इतकी रक्कम द्यावी लागणार आहे. सन 2019-20 या अर्थिक वर्षांमध्ये टप्याटप्याने ही रक्कम पीएमपीएमएलला अदा करावयाची आहे. उर्वरित 650 इलेक्ट्रीक बसेस फेब्रुवारी 2020 अखेर पीएमपीएमएलला खरेदी करावयाच्या आहेत.

भाडे करारावरील या बसेस पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप या तत्वावर धावणार आहेत. या बसचीही किंमत प्रति बस 50 लाख रुपये असून 40 टक्के हिश्श्याप्रमाणे 260 बसची किंमत अर्थात 130 कोटी रुपये इतकी रक्कम पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे पीएमपीएमएला अदा करावी लागणार आहे. अशी एकूण 480 बस खरेदीसाठी 237 कोटी 44 लाख रुपये इतकी रक्कम महापालिकेतर्फे पीएमपीएमएलला दिली जाणार आहे. महासभेत उपसुचनेद्वारे त्याला मान्यता देण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.