Pimpri: शहीद जवानांच्या कुटुंबीयांना महापालिका करणार पाच लाखाचे आर्थिक सहाय्य

एमपीसी न्यूज – देशाचे रक्षण करत असताना वीरमरन येणा-या जवानांच्या कुटुबियांना महापालिका पाच लाखाचे आर्थिक सहाय्य करणार आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील रहिवाशी असलेल्या जवानांच्या कुटुंबीयांनाच सहाय्य केले जाईल. याबाबतच्या प्रस्तावाला स्थायी समितीच्या आज (बुधवारी) झालेल्या सभेत आयत्यावेळी मान्यता दिली. महासभेची मान्यता मिळाल्यानंतर या प्रस्तावाची अमंलबजावणी होईल.

स्थायी समितीची साप्ताहिक सभा आज पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी संतोष लोंढे होते. दिघी परिसरात 1800 जवानांची कुटुंबे आहेत. या सैनिक परिवारातील मुले सैन्यात देशसेवा करत आहेत. दिघीचे नगरसेवक विकास डोळस यांनी शहीद जवानांच्या कुटुबियांना महापालिकेने आर्थिक सहाय्य करावे, अशी मागणी केली होती. त्यानुसार याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीच्या सभेत मंजुर करण्यात आला आहे.

याबाबत नगरसेवक विकास डोळस म्हणाले, पिंपरी-चिंचवड शहरात मोठ्या संख्येने सैनिक कुटुंब शिक्षण आणि रोजगाराच्या उद्देशाने स्थायिक झालेले आहेत. शहरात कित्येक वर्षांपासून राहत असलेल्या या सैनिक परिवारातील मुले सैन्यात देशसेवा करत आहेत. जम्मू काश्मीरसह लेह- लडाख व इतर भागात अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये सीमेवर देश रक्षणासाठी तैनात आहेत.

राज्यातील विविध जिल्ह्यातील जवान शहीद झाल्यावर केंद्र सरकार तसेच राज्य सरकार व स्थनिक पातळीवर शहीद परिवारास आर्थिक मदत केली जाते. परंतु, पिंपरी महापालिकेकडून आर्थिक मदत केली जात नव्हती. पिंपरी-चिंचवड शहरात स्थायिक असलेल्या सैनिक परिवारातील जवान देशसेवा करताना शहीद झाल्यास त्या कुटुंबाला महापालिकेच्या वतीने पाच लाखाची आर्थिक मदत केली जाणार आहे.

महापालिकेच्या वतीने उपलब्ध झालेला हा निधी शहीद कुटुंबातील मुलांच्या शिक्षणासाठी व भविष्यासाठी खूप मोठा हातभार लावेल. सैनिक परिवाराचे मनोबल निश्चितच उंचावले जाईल. जवानांच्या सर्वोच्च बलिदानाचा मान-सन्मान राखण्याचे कार्य या निमित्ताने निश्चितच होईल, असा विश्वास डोळस यांनी व्यक्त केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.