Pimpri: महापालिकेतील कर्मचा-यांना सुट्टी दिवशीच्या कामाचा मिळेना पगार

कर्मचा-यांचा पगार अदा करा; प्रशासनाचे विभागप्रमुखांना पत्र

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सार्वजनिक सुट्टी दिवशीही काम केलेल्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचा-यांचा सुट्ट्याचा पगार अदा करण्यात आला नाही. त्याबाबत कर्मचा-यांच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. विभागप्रमुखांनी तत्काळ कर्मचा-यांच्या सार्वजनिक सुट्ट्यांचा पगार अदा करण्याचा आदेश प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त मनोज लोणकर यांनी दिला आहे. याबाबत विभागप्रमुखांना पत्र पाठविले आहे.

पिंपरी महापालिकेतील अत्यावश्यक सेवेतील विविध विभागांमधील कर्मचारी सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी कामकाज करीत असतात. सुट्टीदिवशी कामकाज करणा-या वर्ग तीन आणि वर्ग चारच्या कर्मचा-यांना त्याचा पगार अदा केला जातो. प्रशासन विभागाने त्याबाबतचे धोरण निश्चित केले आहे.

सार्वजनिक सुट्ट्यांचे पगार अदा करण्यासाठी अटी-शर्ती निश्चित केल्या आहेत. त्यानुसार सार्वजनिक सुट्ट्यांचे पगाराची बिले प्रत्येकवर्षी दिवाळी सणापूर्वी लेखा विभागाकडे पाठविणे बंधनकारक आहे. तथापि, अत्यावश्यक सेवेतील अनेक विभागातील वर्ग तीन आणि चारच्या कर्मचा-यांना सार्वजनिक सुट्ट्यांचा पगार आजअखेर अदा करण्यात आला नाही. त्याबाबतच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.

ज्या विभागांनी अत्यावश्यक सेवेतील वर्ग तीन आणि चारच्या कर्मचा-यांचा सार्वजनिक सुट्टीचा पगार आजअखेर अदा केलेला नाही. या विभागांच्या प्रमुखांनी तत्काळ कर्मचा-यांचा सार्वजनिक सुट्टीचा पगार अदा करण्याची दक्षता घ्यावी, असे परिपत्रकात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.