Pimpri: स्वच्छ सर्वेक्षणात महापालिकेची सुधारणा, दुस-या लीगमध्ये शहर 14 व्या क्रमांकावर

एमपीसी न्यूज – मागील तीन वर्षांपासून स्वच्छ सर्वेक्षणात पिछाडीवर जात असलेल्या पिंपरी-चिंचवड शहराची यंदा सर्वेक्षणात सुधारणा होत आहे. गतवर्षी देशात 52 स्थानावर फेकलेल्या पिंपरी महापालिकेने यंदा स्वच्छता लीगच्या दुसऱ्या टप्प्यात 14 व्या क्रमांकाचे स्थान मिळविले आहे. तर, पहिल्या लीगमध्ये सहावा क्रमांक पटकाविला होता. आता तिस-या लीगचे सर्वेक्षण सुरू आहे. त्यासाठीही महापालिकेने जय्यत तयारी केली असल्याचे मुख्य आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के. अनिल रॉय यांनी सांगितले.

पिंपरी-चिंचवड शहरात स्वच्छ सर्वेक्षण 2020 सुरु झाले आहे. व्यापक स्वरुपात नागरिकांचा व समाजातील सर्व स्तरांचा सहभाग स्वच्छ भारत अभियानामध्ये घेणे व याकरिता त्यांच्यामध्ये माहिती, शिक्षण व संवादाद्वारे साधून त्यांच्या वर्तनातील बदल घडवणे हा या सर्वेक्षणाचा प्रमुख हेतू आहे.

केंद्र सरकारने मागील वर्षापासून स्वच्छ सर्वेक्षणात बदल केला आहे. स्वच्छ सर्वेक्षण वर्षातून एकाचवेळी करण्याचे बंद केले आहे. त्याऐवजी प्रत्येक तीन महिन्यांनी सर्वेक्षण केले जात आहे. त्यानुसार पाहिले सर्वेक्षण लीग मार्च ते मे आणि दुसरे लीग जून ते ऑगस्ट या कालावधीत झाले होते. पहिल्या लीगमध्ये पिंपरी-चिंचवड महापालिका सहाव्या क्रमांकावर होती. तर, दुस-या लीगमध्ये पिंपरी महापालिका 14 व्या क्रमांकावर आली आहे.

आता तिस-या लीगचे सर्वेक्षण सुरू आहे. त्यासाठीही महापालिकेने जय्यत तयारी केली आहे. दुस-या लीगसाठी महापालिकेने 1646 गुणांचा दावा केला होता. परंतु, 1409 गुण मिळाले आहेत. दरम्यान, या दोन लीगमध्ये पहिल्या दहा शहरात नवी मुंबई आणि नाशिक शहराचा समावेश आहे. तर, इंदोर या दोन्ही लीगमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे.

याबाबतची माहिती देताना मुख्य आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के. अनिल रॉय म्हणाले, ”शहरात स्वच्छ सर्वेक्षण सुरु आहे. त्याचे पहिले दोन लीग पूर्ण झाले आहेत. पहिल्या लीगमध्ये शहराचा सहावा तर दुस-या लीगमध्ये 14 वा क्रमांक आला आहे. या सर्वेक्षणात दुरध्वनीवरुन नागरिकांचा अभिप्राय घेतला होता. आता तीस-या लीगचे सर्वेक्षण होईल. हे सर्वेक्षण प्रत्यक्ष जागेवर भेट देऊन होणार आहे”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.