Pimpri: महापालिकेचा दुजाभाव! हंगामी प्राध्यापकांचे पूर्णवेतन, कायमस्वरुपी डॉक्टरांचे अर्धेवेतन अदा

भेदभावामुळे कायमस्वरुपी डॉक्टरांचा नाराजीचा सूर

एमपीसी न्यूज – महापालिका प्रशासनाने वायसीएम रुग्णालयातील पदव्युत्तर अभ्यासक्रम संस्थेच्या हंगामी प्राध्यपकांचे 100 टक्के वेतन अदा केले. तर, कोरोनाच्या लढाईत 18-18 तास काम करणा-या महापालिकेच्या कायमस्वरुपी डॉक्टरांचे अर्धेच वेतन अदा केले आहे. या दुजाभावामुळे महापालिकेच्या कायमस्वरुपी वैद्यकीय अधिकारी, डॉक्टरांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

कोरोना निर्मुलनासाठी प्राध्यापक आणि आम्ही करत असलेले काम समान असतानाही हा भेदभाव का, असा सवालही डॉक्टरांकडू विचारला जात आहे. यामुळे अत्यावश्यक सेवेत काम करणारे डॉक्टर नाऊमेद झाले आहेत. आयुक्तांनी स्वत:च्या अधिकारात पूर्णवेतन द्यावे, अशी मागणी डॉक्टरांकडून केली जात आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने सरकारी कर्मचा-यांचे वेतन दोन टप्प्यात देण्याचा निर्णय घेतला. तर, स्थानिक स्वराज्य संस्थांनी आपली आर्थिक स्थिती पाहून कर्मचा-यांचे वेतन करावे असे स्पष्ट केले होते. मात्र, पिंपरी महापालिका आयुक्त हर्डीकर यांनी राज्य सरकारच्या आदेशानुसार पहिल्या टप्प्यात श्रेणी ‘अ’ आणि ‘ब’च्या कर्मचार्‍यांना 50 टक्के, ‘क’ श्रेणी कर्मचा-यांचे 75 टक्के वेतन अदा करण्याचा तर ‘ड’ श्रेणीच्या कर्मचार्‍यांना शंभर टक्के वेतन अदा केले.

महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयातील पदव्युत्तर संस्थेसाठी हंगामी प्राध्यापकांची कंत्राटी स्वरुपात नियुक्ती केली आहे. अधिष्ठांत्यांसह 40 प्राध्यापक या संस्थेत हंगामी स्वरुपात कार्यरत आहेत. त्यातील अधिष्ठ्यात्याला पावणे दोन लाख वेतन असून सर्वांचे वेतन त्याच रेंजमध्ये आहे. त्या सर्व हंगामी प्राध्यापकांचे वेतन महापालिकेने 100 टक्के अदा केले आहे. तर, कोरोनाच्या विरोधात लढणा-या महापालिकेच्या कायमस्वरुपी वैद्यकीय अधिकारी, डॉक्टरांचे अर्धेच वेतन अदा केले आहे. या दुजाभावामुळे डॉक्टरांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे.

ते प्राध्यापक हंगामी आहेत. आम्ही कायम आहोत. राज्य सरकारच्या निर्णयावर आमचा आक्षेप नाही. मात्र, हंगामी प्राध्यापक जास्तीचे काम करत नसतानाही त्यांना पुर्ण पगार दिला आहे. आम्हाला मात्र अर्धा पगार दिला जातो. याची राज्य सरकारने दखल घ्यावी. आम्ही अत्यावश्यक सेवेतील आहोत.

आता 18-18 तास काम करत आहोत. महापालिकेची आर्थिक स्थिती चांगली आहे. बजेट सहा हजार कोटीचे आहे. आयुक्तांना पुर्ण वेतन अदा करण्याचा अधिकार आहे. त्यामुळे आयुक्तांनी त्यावर सकारात्मक निर्णय घेणे आवश्यक आहे.

महापालिकेत केवळ 60 ते 70 डॉक्टर आहेत. कोरोनामुळे हे डॉक्टर 18-18 तास काम करत आहेत. असे असतानाही अर्धेवेतन दिल्यामुळे डॉक्टरांमध्ये नाराजीचा सूर आहे. वेतनात भेदभाव झाल्यामुळे डॉक्टर नाऊमेद झाले आहेत. अत्यावश्यक सेवेतील डॉक्टरांना पुर्ण वेतन देण्यात काहीही गैर नाही, अशी मागणी डॉक्टरांकडून केली जात आहे.

दरम्यान, डॉक्टरांचा उर्वरित अर्धा पगार दिला जाणार आहे. परंतु, तो तिजोरी पाहून नंतर दिला जाणार आहे. अत्यावश्यक सेवेत असून आता 18-18 तास काम करुनही अर्धा पगार मिळाल्याने डॉक्टरांमध्ये संताप निर्माण झाला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.