Pimpri: कोरोनाग्रस्त रुग्णांकडून जादा बील आकारल्यामुळे आयुष मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलला पालिकेची नोटीस

नोटीस मिळाल्यापासून 48 तासांत खुलासा मागविला आहे. : Municipal notice to AYUSH Multispeciality Hospital for charging extra bills from corona patients

एमपीसी न्यूज – कोरोना बाधित रुग्णांकडून महाराष्ट्र सरकारने निश्चित केलेल्या दरांपेक्षा जास्त दराने वैद्यकीय बिल आकारल्याप्रकरणी नेहरूनगर येथील आयुष मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलला पिंपरी-चिंचवड महापालिकेने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. तसेच नोटीस मिळाल्यापासून 48 तासांत खुलासा मागविला आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातील खासगी रुग्णालयात कोरोना बाधित रुग्णांकडून वैद्यकीय खर्चाची बिले अवास्तव रकमांची येत असल्याची तक्रारी आहेत.

बिलांच्या तपासणीसाठी आयकर विभागाचे सह आयुक्त एन.अशोक बाबू यांच्या नेतृत्वात तयार करण्यात आलेल्या समितीला नेहरूनगर येथील आयुष मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलने शासन निश्चित दरांपेक्षा जास्त दराने वैद्यकीय बिल आकारणी केल्याबद्दल 9 रुग्णांच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या.

त्यानुसार आज वैद्यकीय समितीने या हॉस्पिटलला भेट देऊन तेथील बिलांची तपासणी केली असता तक्रारीमध्ये तथ्य आढळून आले.

एन.अशोक बाबू यांच्या वैद्यकीय समितीने आयुष मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलला भेट देऊन तेथील वैद्यकीय बिलांची तपासणी केली असता हॉस्पिटलमार्फत लावण्यात आलेले दर हे शासनाने निश्चित केलेल्या दरांपेक्षा जास्त आढळून आले.

हॉस्पिटलने कन्सल्टंट चार्जेस, ॲड्मीन चार्जेस, बेड चार्जेस, पीपीई किट चार्जेस आदी शासन निश्चित दरांपेक्षा जास्त आकारल्याचे दिसून आले.

तसेच शासनाने कोरोना बाधित रुग्णांसाठी स्वतंत्र प्रवेशद्वार करण्याच्या शासनाच्या सूचना असताना देखील हॉस्पिटलमध्ये सर्व रुग्णांसाठी एकच प्रवेशद्वार असल्याचे समितीस आढळून आले.

त्याबाबत देखील रुग्णालय प्रशासनाला तातडीने दोन स्वतंत्र प्रवेशद्वार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

शासनाने कोरोना बाधित रुग्णांवर उपचारासाठी निश्चित केलेले दरपत्रक रुग्णालयामध्ये दर्शनी भागामध्ये लावण्याच्या सूचना दिल्या असताना देखील हॉस्पिटल प्रशासनाने शासनमान्य दरपत्रक दर्शनी भागात लावले नसल्याचे वैद्यकीय समितीला आढळून आले. रुग्णालय प्रशासनाला दरपत्रक लावण्याबाबतच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

आयुष मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलला कोरोना बाधित रुग्णांकडून पीपीई किटची वेगवेगळ्या दराने आकारणी करणे, कोरोना संशयित व कोरोना बाधित रुग्णांसाठी स्वतंत्र व्यवस्था नसणे, नर्सिंग नोट्स व अतिदक्षता विभागात दाखल रुग्णांची माहिती अद्यावत न ठेवणे, कोरोना बाधित रुग्णांचा अहवाल, चाचणीचे अहवाल यामध्ये अनियमितता राखणे आदी बाबत 24 तासांमध्ये खुलासा करण्याचे आदेश एन. अशोक बाबू यांनी दिले आहेत.

पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोना बाधित रुग्णांकडून खासगी रुग्णालयांनी ज्यादा वैद्यकीय बिल आकारले असल्यास याबाबत रुग्णांनी [email protected][email protected] या ईमेल वर आपली तक्रार नोंदवावी, असे आवाहन पालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.