Pimpri: दिल्लीतील शाळांच्या धर्तीवर महापालिका शाळांचा विकास होणार; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा

एमपीसी न्यूज – विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण मिळावे यासाठी दिल्लीमधील सरकारी शाळांच्या धर्तीवर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शाळांचा विकास करण्यात येणार आहे. याबाबतची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.

शालेय शिक्षण विभागाची आढावा बैठक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आणि शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवारी झाली. अजित पवार म्हणाले, शिक्षण हा राज्य सरकारचा प्राधान्याचा विषय आहे. सर्वसामान्यांच्या मुलांना दर्जेदार शिक्षण मिळेल यासाठी शिक्षण विभागाने प्रयत्नशील राहिले पाहिजे. शिक्षणासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, परंतु शासकीय निधीचा अपव्यय रोखला पाहिजे.

यापूर्वी निर्णय घेतल्याप्रमाणे कायम विनाअनुदानित शाळांना टप्प्याटप्प्याने अनुदान देण्याची कार्यवाही करण्यात येईल. त्यासाठी शिक्षण विभागाने शाळांची सर्वंकष पडताळणी करून यादी वित्त विभागाला सादर करावी. वित्त विभागाने फेरपडताळणी करून पात्र शाळांना अनुदान वितरणाची कार्यवाही करावी, असे आदेशही त्यांनी दिले.

दिल्लीच्या शाळांचा दर्जा सध्या देशामध्ये नावाजला जात आहे. या शाळांच्या धर्तीवर मुंबईसह पाच महापालिकांच्या शाळांचा विकास करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.