Pimpri: पालिकेची यंत्रणा केवळ कागदावरच प्रभावी; आयुक्त, वैद्यकीय अधिकारी फोन उचलत नाहीत- नगरसेवकांचा हल्लाबोल

आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे फोन उचलत नाहीत. त्यांना समज द्यावी, अशी मागणीही भाजप नगरसेवकांनी महापौरांकडे केली.

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाची परिस्थिती गंभीर होत आहे. रुग्णसंख्या वाढत असून मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. रुग्णांना पालिका रुग्णालयात योग्य उपचार मिळत नाहीत. पालिकेची यंत्रणा केवळ कागदावर प्रभावी आहे. प्रत्यक्षात मात्र ती पोकळ असल्याचा आरोप करत सत्ताधा-यांसह विरोधकांनी प्रशासनाला धारेवर धरले. आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे फोन उचलत नाहीत. त्यांना समज द्यावी, अशी मागणीही भाजप नगरसेवकांनी महापौरांकडे केली.

पिंपरी-चिंचवड महापालिकेची जुलै महिन्याची तहकूब सर्वसाधारण सभा आज (शुक्रवारी) होत आहे. महापौर उषा ढोरे सभेच्या अध्यस्थानी आहेत.

शहरातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. शहरातील रुग्णसंख्या 40 हजाराच्या उंबरठ्यावर वाढत आहे. मृत्यूचे प्रमाण चिंताजनक आहे. एका दिवसाला 41 जणांचा मृत्यू होतो हे चिंताजनक आहे. या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या नगरसेवकांनी आज प्रशासनावर हल्लाबोल केला.

माजी महापौर नितीन काळजे म्हणाले, पालिकेच्या यंत्रणेचे कौतुक केले जाते. मात्र, पालिकेची यंत्रणा केवळ कागदावर सक्षम, प्रभावी दिसत आहे. शहरात कोरोनाची परिस्थिती गंभीर होत आहे.

रुग्णांना योग्य उपचार मिळत नाहीत. आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे साळवे, वैद्यकीय अधिकारी डॉ. शैलजा भावसार फोन उचलत नाहीत. नागरिकांना आम्हाला उत्तर द्यावे लागते. आयुक्तांना फोन उचलण्याचा आदेश द्यावा.

राष्ट्रवादीचे अजित गव्हाणे म्हणाले, काही डॉक्टर चांगले काम करतात. काही डॉक्टर कामचुकारपणा करतात. अशा डॉक्टरांवर कारवाई करावी. कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात पालिका कमी पडत आहे.

_MPC_DIR_MPU_II

रुग्णाला आयसीयूचे बेड मिळत नाहीत. कोरोना संकटात आणखी काम चांगले काम करावे लागेल. प्रशासन चुकीच्या पद्धतीने काम करत आहे. सत्ताधारी भाजपचे नगरसेवक देखील प्रशासनावर टीका करत आहेत. प्रशासनाकडून शहरवासीयांच्या खूप मोठ्या अपेक्षा आहेत. त्याची पूर्तता करावी.

भाजपचे विकास डोळस म्हणाले, वायसीएमध्ये सगळे आलबेल चालले आहे. कोणाचा कोणाला ताळमेळ नाही. रुग्णांवर व्यवस्थित उपचार होत नाहीत. वायसीएम प्रमुखांना समज देण्यात यावी.

राष्ट्रवादीच्या वैशाली घोडेकर म्हणाल्या, शहरातील रुग्णसंख्येत प्रचंड वाढ होत आहे. मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. मृत्यूच्या संख्येत का वाढ होत आहे. याची माहिती दिली पाहिजे. अधिकारी फोन उचलत नाहीत. सातत्याने बैठकीत असल्याचे सांगतात.

भाजपच्या संदीप वाघेरे यांनीही वायसीएम रुग्णालयाच्या कारभारावर हल्लाबोल केला.

भाजपच्या आशा शेंडगे म्हणाल्या, वायसीएममधील पीजीचे डॉक्टर रुग्णाला बघत देखील नाहीत. मृत्यूचे आकडे अपडेट केले जात नाहीत. शहरात रुग्णसंख्या वाढत आहे.

कोरोनाग्रस्त रुग्णांच्या जेवणात अळ्या सापडत आहेत. प्रशासनाचे नियंत्रण आहे का, असा प्रश्नही त्यांनी केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.