Pimpri Murder: गांजा पिताना झालेल्या वादातून केला खून; चौघे पोलिसांच्या ताब्यात

Pimpri: Murder incident in Pimpri; Accused confess to burning oil आरोपीने खून केल्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी ऑइल टाकून जाळला. त्यानंतर उरलेली हाडे नदीत टाकली असल्याचे पोलिसांना सांगितले आहे.

एमपीसी न्यूज- मित्रांसोबत गांजा पिताना झालेल्या भांडणातून चार जणांनी मिळून एका तरुणाचा गळा आवळून तसेच डोक्यात दगड घालून खून केला. तरुणाच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी डिझेल टाकून दोनदा मृतदेह जाळला. तरीही पूर्ण न जळाल्याने तरुणाचा अर्धा अधिक जळालेला मृतदेह पवना नदीत टाकून दिला.

बिल्लू उर्फ विक्की उर्फ जसबीरसिंग गुलजारसिंग विरदी (वय 19, रा. मिलिंद नगर, रिव्हर रोड, पिंपरी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.

नीरज अशोक जांगयानी (वय 26), ललित लालचंद ठाकूर (वय 21), योगेश केशव पंजवाणी (वय 31), हरज्योतसिंग रणजितसिंग लोहिर (वय 22, सर्व रा. पिंपरी) अशी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि मयत बिल्लू हे मित्र होते. ते डेअरी फार्म रोडवर गांजा प्यायला बसले होते. गांजा पिताना त्यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला. या वादातून चार जणांनी मिळून बिल्लू याला गळा दाबून तसेच दगडाने ठेचून ठार मारले.

त्यानंतर बिल्लूच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी आरोपींनी त्याचा मृतदेह डेअरी फार्म रोडवर असलेल्या शिव मंदिराच्या मागे नेला. तिथे बिल्लूच्या अंगावर डिझेल टाकून मृतदेह पेटवून दिला.

दुसऱ्या दिवशी संशयित आरोपींनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता बिल्लूचा मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत होता.

अर्धवट जळाल्याने आरोपींनी मृतदेहावर पुन्हा डिझेल टाकले आणि मृतदेह दुसऱ्यांदा पेटवून दिला. आरोपींनी पुन्हा घटनास्थळी जाऊन बघितले असता अजूनही बिल्लूचा मृतदेह पूर्ण जळाला नव्हता.

त्यामुळे आरोपींनी अर्धवट जळालेला मृतदेह गोळा करून दापोडी येथील पुलावरून नदीत फेकून दिला.

याबाबत 8 मार्च 2020 रोजी पिंपरी पोलीस ठाण्यात बिल्लूच्या बेपत्ता होण्याची नोंद करण्यात आली होती. पोलीस याबाबत शोध घेत होते.

रविवारी पोलिसांनी चार संशयित आरोपींना याप्रकरणी ताब्यात घेतले. आरोपींसोबत पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली आहे.

याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात रविवारी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.