Pimpri crime News: पूर्ववैमनस्यातून दगडी पाटा डोक्यात घालून तरुणाचा खून

शंकर याच्यावर हल्ला केल्यानंतर आरोपींची तेथील दोन वाहनांची तोडफोड केली. या वेळी पाऊस सुरू असल्याने कोणी बाहेर नसल्याचे सांगण्यात येत आहे.

एमपीसी न्यूज – जुन्या भांडणाच्या कारणावरून तरुणावर धारदार शस्त्राने वार केले. तसेच दगडी पाटा तरुणाच्या डोक्यात घातला. यात तो गंभीर जखमी झाला. उपचारादरम्यान जखमी तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (दि. 22) मध्यरात्री सव्वाबारा वाजता विद्यानगर, चिंचवड येथे हनुमान मंदिरासमोर घडली.

शंकर गोविंद सुतार (वय 23, रा. हनुमान मंदिरासमोर, विद्यानगर, चिंचवड) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी संतोष चौगुले (वय 25), अजय कांबळे (वय 23), मोसीन शेख (वय 25), पप्पू पवार (वय 28) या आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी नीला गोविंद सुतार (वय 45) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मुलगा शंकर सुतार व आरोपी यांच्यात काही दिवसांपूर्वी भांडण झाले होते. त्याचा राग आरोपी यांच्या मनात होता. शंकर सुतार हा रात्री हनुमान मंदिरासमोर झोपला. रात्री सव्वाबाराच्या सुमारास आरोपी तेथे आले. त्यांनी झोपेत असलेल्या शंकर याच्यावर धारदार शस्त्राने वार केले.

तसेच दगडी पाटा डोक्यात मारला. यात शंकर गंभीर जखमी झाला. त्याला पिंपरीतील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान शनिवारी त्याचा मृत्यू झाला.

दरम्यान, शंकर याच्यावर हल्ला केल्यानंतर आरोपींची तेथील दोन वाहनांची तोडफोड केली. या वेळी पाऊस सुरू असल्याने कोणी बाहेर नसल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेनंतर आरोपी तेथून पळून गेले.

पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.