Chinchwad : खुनी हल्ल्यातील जखमीचा उपचार दरम्यान मृत्यू

पोलिसांकडून खुनाचा गुन्हा दाखल; आरोपीला अटक

एमपीसी न्यूज- नातेवाईक महिलेसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून एकाने आपल्या सख्या भावावर कुऱ्हाडीने खुनी हल्ला केला. ही घटना चिंचवड स्टेशन येथे गुरुवारी (दि. 10) दुपारी घडली. या घटनेतील जखमी भावाचा उपचारादरम्यान शनिवारी (दि. 12) दुपारी मृत्यू झाला.

दत्ता मच्छिंद्र धावारे (वय 38, रा. आनंदनगर झोपडपट्टी, चिंचवड स्टेशन) असे खून झालेल्या भावाचे नाव आहे. हरिश्‍चंद्र मच्छिंद्र धावारे (वय 40) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत मयत दत्ता यांची पत्नी सारिका धावारे (वय 34) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी दत्ता याचे नातेवाईक महिलेशी अनैतिक संबंध असल्याचा संशय आरोपी हरिश्‍चंद्र याला होता. या कारणावरून त्यांच्यात अनेकदा भांडणही झाले होते. गुरुवारी सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास त्यांच्यात पुन्हा भांडण झाले. त्यानंतर दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास दत्ता हे घरात झोपले होते. त्यावेळी आलेल्या हरिश्‍चंद्र याने त्यांच्यावर कुऱ्हाडीने खुनी हल्ला केला. या घटनेत दत्ता हे गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर वायसीएम रुग्णालयात उपचार सुरू असताना शनिवारी दुपारी त्यांचा मृत्यू झाला. यामुळे पोलिसांनी गुन्ह्यांच्या कलमांमध्ये वाढ करून खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपी हरिश्‍चंद्र याला 14 ऑक्‍टोबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.