Pimpri : रमजाननिमित्त शेवया, सुका मेव्याच्या खरेदीसाठी मुस्लिम बांधवांची लगबग

एमपीसी न्यूज – शिरखुर्म्यासाठी काजू, बदाम, पिस्ते, चारोळी अन बनारसी, पंजाबी शेवया..सहेरी आणि इफ्तारसाठी सौदी अरेबियाचे खजूर…..रोट आणि नानाविध फळे….सामिष भोजनासह भरजरी कपडे…. डोळ्यांना थंडावा देणारा सुरमा…..सुगंधी अत्तर यांसारख्या विविध वस्तूंनी रमजाननिमित्त (बुधवार दि. ५ मे) पिंपरी बाजारपेठ सजली आहे. बाजारात खरेदीसाठी मुस्लिम बांधवांनी मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. पिंपरी चिंचवड शहरातील सर्वात मोठी असलेली नेहरूनगर येथील तवकल्ला जामा मस्जिदवर रमजाननिमित्त आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे

शहर परिसरात नानाविविध टोप्यांसह कुरआनातील आयतच्या तसबिरी, जानमाज, कुरआनच्या प्रती विक्रीस आल्या आहेत. पहाटेची फजर, दुपारची जोहर, सूर्यास्ताअगोदरची असर, सायंकाळी मगरीब आणि रात्रीची ईशाची नमाज पठाण करण्याकरिता मुस्लिम धर्मियांसाठी विविध मशिंदीमध्ये व्यवस्थाही करण्यात आली आहे.

  • पिंपरी बाजारपेठेतील समीर सुगंधी बंडारचे रौफ खान म्हणाले, बनारस, राजस्थान, पंजाब, मालेगाव येथून रंगीबेरंगी शेवया मागवितो. हातावर केलेल्या शेवयाही आल्या आहेत. मात्र, पूर्वीपेक्षा हातावरच्या शेवया प्रमाण कमी आहे. या शेवया हाताळायलाही पातळ आणि दुधातही सहज विरघळणा-या शेवया मालेगाव, राजस्थान, बनारस येथून मागविण्यात आल्या आहेत.

यंदा खारीकचे दर वाढले आहेत. रमजानला अनन्यसाधारण महत्व असलेल्या शिरखुर्म्यासाठी लागणा-या रंगीबेरंगी शेवया आणि सुका मेवा बाजारात मोठ्या प्रमाणावर आला आहे. बदाम, पिस्ता, काजू, खारीक यांच्यासोबत विविध प्रकारचे खजुरसुध्दा सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. खजुराचा किस ही बाजारात पहिल्यांदाच विकला जात आहे. सुका मेव्याचा दर ही स्थिर असून सुका मेव्याच्या खरेदीला मोठी गर्दी होत आहे.

  • ईदसाठी विविध प्रकारच्या बांगडया, गळ्यातील हार, विविध साजची जोरदार खरेदी सुरु आहे. बुरख्यांच्या खरेदीलाही महिलांकडून प्राधान्य दिले जात आहे. अमरेल बुरख्याला अधिक मागणी असून त्याच्या किंमती तेराशे ते साडेतीन हजार रुपयांपर्यंत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.