Pimpri : तबरेज अन्सारी हत्येचा मुस्लिम जमात पिंपरी-चिंचवड शहरकडून निषेध

एमपीसी न्यूज – झारखंडमधील धतकिडीह गावात गावकर-यांच्या समूहाने तबरेज अन्सारी या तरुणाला मारहाण केली. यामध्ये त्याचा मृत्यू झाला. निषेध मुस्लिम जमात पिंपरी-चिंचवड शहर यांच्या वतीने सामूहिक हत्या (मॉब लीचिंग)च्या वाढत्या घटनांचा निषेध व्यक्त करण्यात आला.

पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात निषेध व्यक्त करण्यात आला. मुस्लिम जमात पिंपरी चिंचवड शहरच्या वतीने मौलाना फैजअहमद फैजी, हाजी नसीबुल्लाहा, मौलाना गफ्फार, मौलाना नय्यब नूरी, कारी इकबाल, मौलाना अलीम, मुफ्ती गफ्फार रजा, जावेद शेख, समाज सेवक मानव कांबळे, सामाजिक कार्यकर्ते मारूती भापकर, अल्ताफ शेख, युसूफ कुरेशी, अजहर खान, शाहाबुद्दीन शेख, रफिक कुरेशी, इम्रान बेग, जिल्लानी सय्यद, इम्रान बिजापुरे, अकिल मुजावर, आसिफ सय्यद, धम्मराज साळवी, व्ही. एम. कबिर, सलिम सय्यद, महेबूब शेख, अजूम इनामदार, इस्माईल संगम, सिद्दिक शेख,  नियाज अहमद शेख, निय्याज देसाई, बाळासाहेब रोकडे, इद्रीस मेमन, श्रीधर काळे, शकील खान, एजाज खान आदि उपस्थित होते.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात वेगवेगळी श्रमाची कामे करून आपले पोट भरणारा तबरेज स्वतःच्या लग्नासाठी एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला झारखंड येथील गावी गेला. लग्नानंतर पत्नीसह तो पुन्हा पुण्याला परतणार होता. दरम्यान, ईद आल्याने ईदचा सण साजरा करूनच कामासाठी जायचे त्याने ठरवले. पुण्याला जाण्यापूर्वी नातेवाईकांची भेट घेण्यासाठी मित्रांसोबत गेलेल्या तबरेजची ‘सामूहिक हत्या’ (मॉब लिंचिंग) झाली. चोर समजून त्याच्यावर एका गावातील लोकांनी हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला.

तबरेज सारख्या कित्येक निरापराध लोकांचा सामूहिक मारहाणीत बळी गेला आहे. यामुळे सामाजिक शांतता धोक्यात आली आहे. केवळ एखाद्या विशिष्ट समुदायाचा म्हणून हे हल्ले होत नसून हे होणारे हल्ले मानवी सभ्यतेवर होत आहेत. यामुळे येणा-या पिढीला चुकीचा संदेश जाण्याची शक्यता आहे. समाजात तेढ निर्माण होण्याची शक्यता आहे. शासनाने अशा घटनांकडे वेळीच लक्ष देऊन आरोपींना कठोर शासन करावे, असे मत सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी व्यक्त केले.

‘तबरेज अन्सारी को इन्साफ दो, मॉब लीचिंग का आतंक रोको, मोदी सरकार जुल्म को रोको, तबरेज अन्सारी के कातिलोंको फासी दो, लोकशाही में हुकूमशाही, नहीं चलेगी’ अशा फलकांद्वारे नागरिकांनी निषेध व्यक्त केला. या अत्याचाराविरोधात अत्यंत कडक कायदा करावा, असा ठराव यावेळी मंजूर करण्यात आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.