Pimpri: नाना काटे यांचा विरोधी पक्षनेतेपदाचा कार्यकाल संपुष्टात; कोणाला मिळणार संधी ?

Pimpri: Nana Kate's one-year term as Leader of Opposition ends जावेद शेख हे प्रबळ दावेदार होते. पण, दुर्दैवाने त्यांचे कोरोनामुळे शुक्रवारी (दि.31) रोजी निधन झाले आहे.

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते नाना काटे यांचा विरोधी पक्षनेतेपदाचा वर्षभराचा कार्यकाल 1 ऑगस्ट रोजी संपुष्टात आला आहे. अधिकाधिक नगरसेवकांना संधी मिळावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने दरवर्षी विरोधी पक्षनेता बदलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार काटे यांचा एक वर्षाचा कार्यकाल संपला आहे. त्यामुळे आता पक्षश्रेष्ठी कोणत्या नवीन चेह-याला संधी देणार याबाबत कमालीची उत्सुकता आहे.

पिंपरी पालिकेच्या फेब्रुवारी 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीला विरोधात बसावे लागले. 36 नगरसेवक असलेल्या राष्ट्रवादीचा गटनेता विरोधी पक्षनेता आहे. कोरोनामुळे राष्ट्रवादीच्या दोन नगरसेवकांचे दुर्दैवाने निधन झाले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीची संख्या 34 झाली आहे. विरोधी पक्षनेता हा स्मार्ट सिटीचा पदसिद्ध संचालक असतो. त्यामुळे हे पद मानाचे आहे.

पालिकेतील सत्ता गेल्यानंतर पाहिल्यांदाच विरोधी पक्षात बसलेल्या राष्ट्रवादीने योगेश बहल यांच्याकडे विरोधी पक्षनेतेपदाची धुरा सोपविली होती. त्याचवेळी प्रत्येकवर्षी विरोधी पक्षनेता बदलण्यात येणार असल्याचे राष्ट्रवादीचे नेते, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले होते.

त्यानुसार 17 मार्च 2017 रोजी विरोधी पक्षनेतेपदी बसलेल्या बहल यांनी एक वर्षाचा कार्यकाल संपल्यानंतर 5 मे 2018 रोजी पदाचा राजीनामा दिला होता.

बहल यांच्या जागी दुस-यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे चिखलीतील ज्येष्ठ नगरसेवक दत्ता साने यांची 17 मे 2018 रोजी विरोधी पक्षनेतेपदी वर्णी लागली होती. एकवर्ष पूर्ण झाल्यानंतर पक्षाच्या ठरलेल्या अलिखित नियमानुसार साने यांनी 9 जुलै 2019 राजीनामा दिला होता. दुर्दैवाने साने यांचे 4 जुलै 2020 रोजी कोरोनामुळे निधन झाले आहे.

तिस-यावेळी चिंचवड मतदारसंघातील नाना काटे यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड झाली होती. काटे यांनी 1 ऑगस्ट 2019 रोजी पदभार स्वीकारला होता. त्यांनी भाजपला विरोध करण्याचा प्रयत्न केला.

चुकीच्या कामांविरोधात आयुक्तांना निवेदन देऊन विरोध दर्शविला. पण, त्यांना चमकदार कामगिरी दाखविता आली नाही. काटे यांचा वर्षांचा कार्यकाल 1 ऑगस्ट 2020 रोजी संपुष्टात आला आहे. त्यामुळे पक्षाच्या ठरलेल्या अलिखित नियमानुसार कोरोनाच्या काळात काटे यांचा राजीनामा घेतला जाणार आहे.

पालिकेची आगामी निवडणूक फेब्रुवारी 2022 मध्ये होणे अपेक्षित आहे. त्यानुसार पालिकेची निवडणूक 15 महिन्यावर येवून ठेपली आहे. पुन्हा सत्तेत यायचे असेल. तर, आतापासूनच कामाला लागावे लागणार आहे.

सत्ताधाऱ्यांना घेरण्यासाठी राष्ट्रवादी आक्रमक आणि अनुभवी नगरसेवकाकडे विरोधी पक्षनेतेपदाची धुरा सोपविण्याची शक्यता आहे. राज्यातील सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस सहभागी आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीच्या नगरसेवकांमध्ये उत्साह असून यापुढे राष्ट्रवादी पालिकेतील सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेईल.

‘हे’ आहेत विरोधी पक्षनेतेपदासाठी इच्छुक!
विरोधी पक्षनेतेपदासाठी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नगरसेवक अजित गव्हाणे, राजू मिसाळ, नगरसेविका वैशाली घोडेकर हे इच्छुक आहेत. जावेद शेख हे प्रबळ दावेदार होते. पण, दुर्दैवाने त्यांचे कोरोनामुळे शुक्रवारी (दि.31) रोजी निधन झाले आहे. आगामी पालिका निवडणुकीचा विचार करता विरोधी पक्षनेतेपदासाठी पक्ष अनुभवी नगरसेवकाला संधी देण्याची शक्यता आहे.

पहिल्यांदा पिंपरी दुस-यावेळी भोसरी आणि तिसऱ्यावेळी चिंचवड मतदारसंघातील नगरसेवकाकडे विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी दिली होती. त्यामुळे आता चौथ्यावेळी कोणत्या मतदारसंघात विरोधी पक्षनेतेपद दिले जाते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. दरम्यान, याबाबतचा अंतिम निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार घेणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.