Pimpri : ‘अण्णासाहेब पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या चळवळीला मुख्यमंत्र्यांनी दिला न्याय’

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांचे गौरवोद्गार

एमपीसी न्यूज- मराठा आरक्षणासंदर्भात मोर्चे, आंदोलन यामधून मोठा दबाव असतानाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कायद्याच्या चौकटीमध्ये राहून आरक्षणासाठी प्रामाणिक प्रयत्न केले. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी अण्णासाहेब पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या चळवळीला न्याय दिला आहे असे गौरवोद्गार अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे काढले आहेत.

मराठा आरक्षण विधेयक गुरुवारी विधानसभेत चर्चेविना एकमताने मंजूर करण्यात आले. त्यामुळे मराठा आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे. या पार्श्वभूमीवर नरेंद्र पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार व्यक्त केले आहेत. या प्रसिद्धीपत्रकात नरेंद्र पाटील यांनी म्हटले आहे की, मराठा समाजाला आर्थिक निकषावर आरक्षण मिळावे यासाठी माझे वडील माजी आमदार अण्णासाहेब पाटील यांनी 1980 ते 82 या काळामध्ये महाराष्ट्रातल्या विविध जिल्ह्यांमध्ये दौरा केला आणि मराठा समाजाला एकत्र केलं.

तत्कालीन मुख्यमंत्री बाबासाहेब भोसले यांच्याकडे मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी केली. मात्र ही मागणी बाबासाहेब भोसले यांनी नाकारली.
मराठा समाजाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून खूप मोठी अपेक्षा होती. ती त्यांनी आता पूर्ण केली आहे. आर्थिक आणि शैक्षणिक दृष्टया मागासलेला हा मराठा समाज आहे. या समाजातल्या तरुणाला शासनाकडून मिळालेल्या आरक्षणामुळे मोठा आधार मिळणार आहे. हे आरक्षण मिळण्याच्या टप्प्यांचा विचार करता मुख्यमंत्र्यांच्या बोलण्यात, वागण्यात, विचारात कुठेही लबाडी नव्हती. आरक्षण चळवळीची ज्योत आजपर्यंत वेगवेगळ्या कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी, मराठा महासंघाच्या नेत्यांनी तेवत ठेवली. त्याला आज देवेंद्र फडणवीस सरकारने न्याय दिला आहे.

मराठा आरक्षण मिळावे यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांची स्वतःची इच्छाशक्ती मोठी होती. मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे यासाठी ते प्रामाणिक होते. मुख्यमंत्र्यांवर विविध मोर्चे, आंदोलन इत्यादींचा मोठा दबाव असून देखील त्यांनी कुठे घाईगडबड केली नाही. त्यांनी कायद्याच्या चौकटीमध्ये राहून मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे यासाठी आवश्यक ते प्रामाणिक प्रयत्न केले. आंदोलकांच्या दबावाखाली येऊन मराठा समाजाला आरक्षण देण्याची घोषणा करणे सोपे होते मात्र ते कोर्टात पुन्हा टिकले नसते. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी कॅबिनेटच्या सगळ्या सहकाऱ्यांना अहवाल दाखवला आणि त्यावर चर्चा केली आणि चर्चा केल्यानंतर निर्णय जाहीर केला.

माझ्या घरामध्ये माझ्या वडिलांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी चळवळ सुरू केली होती आणि त्या चळवळीला आज खऱ्या अर्थाने न्याय मिळाला. शासनाने मराठा समाजाला आरक्षण दिल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांचे आणि शासनाचे मोठ्या संख्येने माथाडी कामगार जो अण्णासाहेब पाटील यांचा मावळा आहे तो आणि महाराष्ट्रातील तमाम मराठा समाज मुख्यमंत्र्यांचे आणि त्यांच्या मंत्रिगटाचे आभार मानतो असेही या प्रसिद्धीपत्रकात नरेंद्र पाटील यांनी म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.