Pimpri : संपूर्ण समाजाचा जीवनस्तर उंचावल्याशिवाय राष्ट्रविकास होणार नाही : विजय कुवळेकर

लाडशाखीय वाणी समाजाच्या राष्ट्रीय महाअधिवेशनात प्रथम चर्चासत्र संपन्न

एमपीसी न्यूज – लाडशाखीय वाणी समाज महासंघाच्या वतीने लाडशाखीय वाणी समाजाचे राष्ट्रीय महाअधिवेशन मारूंजी, पुणे येथे आयोजित करण्यात आले आहे. शनिवारी (दि. 24 ) उद्‌घाटनपूर्व प्रथम चर्चासत्रात समाज विकासात तरुणांचे स्थान या विषयावर कुवळेकर मार्गदर्शन करीत होते.संपूर्ण समाजाचा जीवनस्तर उंचावल्याशिवाय राष्ट्रविकास होऊ शकत नाही. प्रत्येक प्रश्नाकडे आपण कसे पाहतो. त्यातून विकासाची दृष्टी मिळून पुढील ध्येयधोरणे ठरतात, असे मत ज्येष्ठ पत्रकार विजय कुवळेकर यांनी व्यक्त केले.

या वेळी ज्येष्ठ मार्गदर्शक अविनाश धर्माधिकारी, प्रा. डॉ. जगदीश चिंचोरे, बाळासाहेब पांडे, नितीन चितोडकर, बाळासाहेब पाटे, अतुल कोतकर, प्रशांत कोतकर, वाहतूक शाखेच्या सहाय्यक पोलिस उपायुक्त तेजस्वी सातपुते आदी व्यासपीठावर उपस्थित होते. या वेळी ज्येष्ठ बांधकाम व्यावसायिक राजेंद्र पाटे आणि किरण बागड यांचा समाजाच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला.

अविनाश धर्माधिकारी म्हणाले की, समाजाने कळत नकळत अभ्यासाची उतरंड तयार केली आहे. त्यामुळे मुला-मुलींवर ठराविक क्षेत्रातच करिअर करण्यासाठी दबाव आणला जातो. त्यापेक्षा त्यांना कोणत्या क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा आहे. त्यांची क्षमता, उपलब्ध संधी, त्या क्षेत्रातील त्यांचे भवितव्य, कुटुंब, समाज आणि देश विकासासाठी त्यांच्या करिअरचा उपयोग या गोष्टी प्राधान्याने विचारात घेऊनच निर्णय घ्यावा. शासकीय सेवेत प्रशासकीय अधिकारी होत असताना सत्ता, पैसा, प्रतिष्ठा, सन्मान या पेक्षा समाजाची, देशाची सेवा करण्याची संधी मिळते, हे महत्वाचे आहे, असे धर्माधिकारी यांनी सांगितले.

वाहतूक शाखेच्या सहाय्यक पोलिस उपायुक्त तेजस्वी सातपुते म्हणाल्या की, चारीबाजूंनी चांगले काम केले तर समाज आणि देश मोठा होईल. पुण्याचा चहूबाजूंनी विकास होत आहे. त्यामुळे राहण्यायोग्य शहर म्हणून पुणे शहराने प्रथम क्रमांक मिळविला आहे.परंतू येथे वाहतुकीची आणि पायाभूत सुविधांची गंभीर समस्या आहे,असेही सातपुते म्हणाल्या.

बांधकाम आणि विपणन व्यवसाय – भविष्यातील संधी या विषयावर ज्येष्ठ बांधकाम उद्योजक सतीष मगर, अमर मांजरेकर,संजीव बजाज यांची प्रकट मुलाखत अनघा वाटवे यांनी घेतली. यामध्ये ग्राहकांना चांगल्या सुविधा देताना अधिक आणि नियमित उत्पन्न कसे मिळेल याचा विचार करून प्रकल्प उभे करावेत, असे या उद्योजकांनी सांगितले.

यावेळी शामकांत शेंडे, अनिल चितोडकर, किरण पिंगळे, अभय केळे आदी उपस्थित होते. पाहुण्यांचा परिचय ऋतुजा अमृतकर यांनी तर सुत्रसंचालन ज्येष्ठ अभिनेते राहुल सोलापूरकर, समीरा गुजर यांनी केले. आभार महेंद्र येवले यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.