Pimpri : राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पडळकरांचा प्रतिमेला मारले जोडे

NCP activists hit the image of Padalkar

एमपीसीन्यूज : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या बेताल वक्तव्याचा पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेस आणि युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पडळकरांच्या प्रतिमेला काळे फासत जोडे मारून  निषेध नोंदवला.

पडळकरांनी आपल्या वादग्रस्त विधानाची जाहीर माफी मागावी अन्यथा त्यांच्या तोंडाला काळं फासून चोप देऊ, असा इशारा राष्ट्रवादीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी दिला आहे.

पिंपरी येथे झालेल्या या आंदोनात शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष रविकांत वर्पे, राष्ट्रवादी युवकचे अध्यक्ष विशाल वाकडकर, प्रदेश सरचिटणीस लाला चिंचवडे, राष्ट्रवादी युवक पिंपरी उपाध्यक्ष संतोष वाघेरे, मयुर जाधव, निखील दळवी, नाना वाकडकर, नवनाथ वाळूजकर व इतर कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

… तर पिंपरी चिंचवड शहरात पाय ठेवू देणार नाही

यावेळी संजोग वाघेरे म्हणाले, शरद पवार यांच्याबद्दल वादग्रस्त बोलायची महाराष्ट्रातील विरोधकांची देखील हिंमत होत नाही. मात्र, ही चुका पहिल्यांदाच मुख्यमंत्री बनलेल्या फडणवीस यांच्या डोक्यात सत्तेची हवा घुसली आणि केली. त्यांनी पवार साहेबांचं राजकारण संपलं, अस म्हटल्याचे त्यांना प्रायचित्त मिळाले व त्यांना खुर्चीवरून खाली बसावे लागले.

पवार साहेबांंचं राजकारण संपलं असा भाजपचा प्रचाराने महाराष्ट्रातील शेतकरी राजा, नवीन युवक व माता-भगिनींना रुचला नाही आणि नियतीने त्यांची खुर्चीच हिरावून घेतली. त्यांनाही राजकारणातला बापमाणूस कोण याचा नुकताच साक्षात्कार झाला.

तीच हवा नव्याने आमदार झालेल्या नवनाथ पडळकर यांच्या डोक्यात घुसली आहे का ? त्यांनी पवार साहेबांवर टीका करताना स्वतःची उंची तपासावी. तसेच केलेल्या वक्तव्याचे जाहीर माफी मागावी अन्यथा त्यांना पिंपरी चिंचवड शहरात पाय ठेवू देणार नाही, असा इशारा वाघेरे यांनी दिला आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like