Pimpri: महासभेतील उपसूचना मंजुरीला राष्ट्रवादीचा विरोध

अंमलबजावणी न करण्याची मागणी; विरोधी पक्षनेत्यांचे आयुक्तांना पत्र

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शुक्रवारी (दि.10) झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये सत्ताधार्‍यांनी बहुमताच्या जोरावर अनेक विषयांना उपसूचनेसह मंजुरी दिली आहे. सभाशास्त्राचे नियम पायदळी तुडवित तसेच दिलेल्या उपसूचना या सुसंगत नसल्याने त्याची अंमलबजावणी करू नये, अशी मागणी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी आयुक्तांकडे केली आहे.

याबाबत काटे यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांना लेखी निवेदन दिले असून त्यात म्हटले आहे की, शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेतील कामकाज हे बेकायदा आहे. कोणत्याही विषयाला उपसूचना द्यावयाची झाल्यास ती उपसूचना ही विषय पत्रिकेवरील विषयाशी सुसंगत असावी लागते. कायद्यामध्ये त्याबाबत स्पष्टता आहे. मात्र, शुक्रवारच्या सभेत एकही उपसूचना विषयाशी सुसंगत अथवा तर्कसंगत नाही.

चुकीच्या पद्धतीने या उपसूचना देण्यात आल्या आहेत. सभाशास्त्र नियम व महाराष्ट्र महापालिका अधिनियमनुसार विषय व उपसूचना मंजूर केलेल्या नाहीत. त्यामुळे सभेमध्ये जे विषय उपसूचनेसह मंजूर करण्यात आले आहेत. त्या विषयाची व उपसूचनांची अंमलबजावणी करण्यात येऊ नये. सदरची बाब मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निदर्शनास आणून दिली जाणार असल्याचेही या पत्रकात काटे यांनी म्हटले आहे

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.