Pimpri : पाणी कपातीच्या विरोधात राष्ट्रवादीचे निषेध आंदोलन

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेने एक दिवसाआड सुरु केलेल्या पाणीपुरठ्याला नागरिकांचा विरोध वाढत आहे. पाणीकपात केल्याच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने आज (बुधवारी) महापालिकेच्या प्रवेशद्वाराजवळ आंदोलन केले. सत्ताधारी आणि प्रशासनाचा निषेध केला.

शहराध्यक्ष संजोग वाघेरे, विरोधी पक्षनेते नाना काटे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले. नगरसेविका वैशाली काळभोर, सुमन पवळे, संगीता ताम्हाणे, नगरसेवक अजित गव्हाणे, राजू बनसोडे, प्रवीण भालेकर, संजय वाबळे, प्रवक्ते फजल शेख, विजय लोखंडे, युवक अध्यक्ष विशाल वाकडकर, सुनील गव्हाणे यांच्यासह कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.

पिंपरी-चिंचवड महापालिकेने 25 नोव्हेंबरपासून एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरु केला आहे. समन्यायी पाणी वाटपासाठी हा निर्णय घेतल्याचे प्रशासनाने सांगितले आहे. परंतु, एक दिवसाआड पाणीपुरवठा केला. तरी देखील तक्रारी कमी झाल्या नाहीत. पाण्याचा प्रश्न जैसे थे आहे. त्यामुळे पाणीकपातीच्या निर्णयाला विरोध वाढत आहे.

विरोधी पक्षनेते नाना काटे म्हणाले, “पिंपरी-चिंचवडकरांची तहान भागविणा-या पवना धरणात मुबलक पाणीसाठा आहे. प्रशासनाला त्याचे नियोजन करता आले नाही. प्रशासन आपल्या चूका नागरिकांच्या माथी मारत आहे. एकदिवसाआड पाणीपुरवठा सुरु केल्यापासून अनियमित पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे तत्काळ पाणी कपात रद्द करण्यात यावी”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.