Pimpri: राष्ट्रवादी काँग्रेसने पालिकेच्या प्रवेशद्वारासमोर बडविले ढोल !

गणेशोत्सव स्पर्धेचे बक्षीस वितरण न केल्यामुळे केले अनोखे आंदोलन

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महालिकेच्या वतीने सन 2017 मध्ये घेण्यात आलेल्या गणेशोत्सव स्पर्धेचे बक्षीस वितरण अद्यापही केले नाही. त्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसने आज (सोमवारी)महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर ‘ढोल बजाओ’ आंदोलन केले.

गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी ढोल बजाविले. ढोलच्या दणदणाटाने पालिकेचा परिसर दणाणून गेला होता. या अनोख्या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, विरोधी पक्षनेते दत्ता साने, नगरसेवक मयूर कलाटे, राजू बनसोडे, नगरसेविका पोर्णिमा सोनवणे, संगीता ताम्हाणे, विनया तापकीर, गणेश भोंडवे आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते. गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी अर्धा तास पालिकेसमोर ढोल वाजविले.

विरोधी पक्षनेते दत्ता साने म्हणाले, ‘महापालिकेच्या वतीने गतवर्षी घेण्यात आलेल्या गणेशोत्सव सजावट स्पर्धेत 62 मंडळांनी सहभाग घेतला होता. त्यापैकी 38 मंडळांना बक्षीस जाहीर झाले. त्यासाठी केवळ पाच लाख रुपये खर्च येणार आहे. परंतु, अद्यापही बक्षिसाचे वितरण करण्यात आले नाही. न्यायालयाच्या निर्णयाचे कारण दिले जाते. यामध्ये काहीतरी तोडगा काढणे अपेक्षित होते. अनेक न्यायालयाचे अनेक निर्णय आहेत. त्याचे पालन महापालिकेकडून केले जाते आहे का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

सत्ताधारी भाजपला गणेश मंडळांना बक्षीस देण्याची प्रथा मोडित काढायची आहे. पिंपरी-चिंचवड फेस्टिवल देखील त्यांनी बंद पाडला आहे. संस्कृती रक्षक असलेल्या सत्ताधा-यांना परंपरा मोडीत काढायच्या आहेत. त्यांचा आम्ही जाहीर निषेध करतो’

संजोग वाघेरे म्हणाले, ” पिंपरी-चिंचवड शहरात प्रत्येक भागात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. सार्वजनिक मंडळांकडून सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी विविध देखावे सादर केले जातात. अशा मंडळांना प्रोत्साहन देण्यासाठी महापालिकेच्या वतीने बक्षीस देण्याची अनेक वर्षापासूनची परंपरा आहे. मात्र ही राष्ट्रवादीने सुरू केलेली चांगली परंपरा सत्ताधारी भाजपा मोडीत काढण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणून या झोपी गेलेल्या सत्ताधाऱ्यांना जागे करण्यासाठी आज ढोल बजाओ आंदोलन करण्यात आले आहे”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.