BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri : राष्ट्रवादीची विधानसभेसाठी उमेदवारांची चाचपणी; शनिवारी मुंबईत बैठक

एमपीसी न्यूज – राष्ट्रवादी काँग्रेसने विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची चाचपणी सुरु केली आहे. सक्षम उमेदवार शोधण्यासाठी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार दोन दिवसांपासून जिल्हावार बैठका घेऊन आढावा घेत आहेत. पिंपरी, चिंचवड आणि भोसरी शहरातील विधानसभा मतदारसंघातील पदाधिका-यांची उद्या (शनिवारी) आढावा बैठक होणार आहे. यामध्ये संभाव्य विधानसभा इच्छुकांच्या नावावर चर्चा होण्याची शक्यता आहे. दरम्यान, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जून अखेर विधानसभेचे उमेदवार जाहीर करणार असल्याचे सांगितले. त्यामुळे शहरातील विधानसभेचे राष्ट्रवादीचे उमेदवार उद्या ठरणार का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत दोन दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते, प्रदेश पदाधिकारी व जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या बैठका होत आहेत. मतदारसंघांचा आढावा घेतला जात आहे. पिंपरी-चिंचवडचा आढावा शनिवारी घेतला जाणार आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादीची दिवसेंदिवस पिछेहाट होत आहे. महापालिका आणि लोकसभा निवडणुकांमध्ये झालेल्या सलगच्या दोन पराभवांमुळे शरद पवार यांनी शहरात जातीने लक्ष घातले. आठ दिवसांपूर्वीच त्यांनी शहरात येऊन कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. लोकसभेच्या पराभवाने, खचून न जाता, नाऊमेद न होता विधानसभेच्या तयारीला लागल्याच्या सूचना त्यांनी केल्या.

2014 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे 41 आमदार निवडून आले होते. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत चार खासदार निवडून आले आहेत. उद्या होणा-या बैठकीत सक्षम उमेदवारांच्या नावांची चाचपणी केली जाईल. राज्यात काँग्रेस बरोबर राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी होणार असून त्यात पक्षाच्या वाट्याला 144 जागा येतील अशी पक्षाची अपेक्षा आहे.

याबाबत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील म्हणाले, ”विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला जाणार आहे. पिंपरी, चिंचवड आणि भोसरी या तीनही विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यात येणार आहे. उमेदवारांची चाचपणी केली जाणार आहे. विधानसभा निवडणुकीत रणनिती काय असली पाहिजे, कोणती खबरदारी घ्यायला हवी, कोणती रणनिती असेल याबाबत शरद पवार मार्गदर्शन करणार आहेत”.

HB_POST_END_FTR-A2

.