Pimpri: राष्ट्रवादीचे इच्छुक गॅसवर !

पहिल्या यादीत शहरातील उमेदवार जाहीर करण्याचे टाळले

एमपीसी न्यूज – आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने बुधवारी रात्री उशिरा आपली पहिली यादी जाहीर केली. या यादीमध्ये पुण्यातील उमेदवार जाहीर केले. परंतु, पिंपरी-चिंचवड आणि भोसरीतील उमेदवार जाहीर केले नाहीत. त्यामुळे राष्ट्रवादीचे इच्छुक गॅसवर गेले आहेत. दरम्यान, चिंचवड आणि भोसरीतून राष्ट्रवादी उमेदवार पुरस्कृत करणार असल्याची चर्चा आहे.

एकेकाळी बालेकिल्ला असलेल्या पिंपरी-चिंचवड शहरात राष्ट्रवादी काँग्रेसला आज सक्षम उमेदवार मिळत नाहीत. अनेकांनी पक्षाकडून निवडणूक न लढविण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे पक्षापुढे प्रबळ उमेदवार शोधण्याची वेळ आली आहे. त्यासाठी भोसरीत विरोधकांना गळ टाकून बघितले. परंतु , विरोधक बधले नाहीत.

चिंचवडमध्ये देखील युतीतील एका पक्षाच्या नगरसेवकाला उमेदवारीची ऑफर केली आहे. परंतु, उमेदवारी स्वीकारण्यास नकार देत या नगरसेवकाकडून पुरस्कृत करण्याची मागणी केली असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यामुळे राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार देते की पुरस्कृत उमेदवार केले जाते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

पिंपरी मतदारसंघात राष्ट्रवादी आशावादी आहे. त्यामुळे पिंपरीतून राष्ट्रवादीकडून लढण्यासाठी विद्यमान आमदारांसह पाच ते सहा जण इच्छुक आहेत. तसेच गायक देखील इच्छुक आहेत. इच्छुक जास्त असल्याने राष्ट्रवादीकडून उमेदवार जाहीर करण्यासाठी विलंब केला जात असल्याचे सांगितले जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.