Pimpri : राज्यातील सत्ता बदलाचा महापालिका कारभारावर होणार परिणाम ; राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना घेरणार भाजपला ?

प्रशासनात चलबिचल, चौकशांचा ससेमिरा मागे लागण्याची चिन्हे

(गणेश यादव)

एमपीसी न्यूज – राज्यात सत्ता बदल होत शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेसचे सरकार स्थापन झाले आहे. या सत्ता बदलाचा भाजपची एकहाती सत्ता असलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कारभारावर परिणाम होण्याची शक्यता आहे. मागील अडीच वर्षात भाजपवर राष्ट्रवादी, शिवसेनेकडून मोठे भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते. त्यामुळे चौकशीचा ससेमिरा मागे लागण्याची शक्यता असल्याने प्रशासनात चलबिचल सुरु झाली आहे. महापालिकेतील सत्ताधा-यांचे धाबे दणाणले आहेत.

फेब्रुवारी 2017 मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीची सत्ता जाऊन भाजपची एकहाती सत्ता आली. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे जवळचे सहकारी असलेले लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे यांना भाजपमध्ये घेतले. त्यांच्या माध्यमातून पिंपरी महापालिकेवर कमळ फुलविले. जवळच्या सहका-यांनी साथ सोडल्याने आणि महापालिकेतील सत्ता गेल्याने अजित पवार नाराज होते. त्यांनी सातत्याने नाराजी बोलून दाखविली होती.

आता राज्यात महाविकासआघाडीचे सरकार आले असल्याने पुण्याचे पालकमंत्रीपद अजित पवार यांच्याकडे येण्याची शक्यता आहे. अजित पवार मंत्रीमंडळ विस्तारात मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. भाजपची सत्ता असलेल्या महापालिका कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता आहे. मागील भाजपच्या तीन वर्षाच्या सत्ता काळात विविध कामांमध्ये भ्रष्टाचाराचे आरोप झाले. पंतप्रधान आवास योजना, संतपीठ, वेस्ट टू इनर्जी, भोसरीतील शीतल बागेतील पूल, रस्ते विकास, ताडपत्री, नदीसुधार अशा प्रत्येक कामात सत्ताधारी भाजपने भ्रष्टाचार केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार, शिवसेना खासदार श्रीरंग बारणे, माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांच्यासह राष्ट्रवादी, शिवसेना नगरसेवकांनी केले होते.

राज्यातील सत्ता बदलल्यामुळे महापालिका प्रशासनात चलबिचल सुरु झाली आहे. चौकशांचा ससेमिरा मागे लागण्याची अधिका-यांमध्ये भीती निर्माण झाली आहे. यापुढे राष्ट्रवादी, शिवसेनेचे नगरसेवक भाजपला भ्रष्टाचाराच्या आरोपांवरुन घेरण्याची शक्यता आहे.

राज्यात 2014 मध्ये भाजपची सत्ता होती. तर, महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती. त्यावेळी भाजपच्या स्थानिक नेत्यांनी राज्य सरकारकडे अनेक कामांच्या तक्रारी केल्यानंतर चौकशा सुरु झाल्या होत्या. तत्कालीन आयुक्त दिनेश वाघमारे विकास कामांवर निर्णय घेत नव्हते असा आरोप राष्ट्रवादीने केले होते. आता शिवसेना-राष्ट्रवादीकडून देखील अशीच भूमिका घेण्याच्या धास्तीने महापालिकेतील सत्ताधा-यांचे धाबे दणाणले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.