Pimpri: राष्ट्रवादीच्या नगरसेविकेने महापालिका प्रवेशद्वारावर स्वखर्चाने बसविले सॅनिटायझर टनेल

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील अधिकारी, कर्मचा-यांच्या सुरक्षिततेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका सुलक्षणा शिलवंत- धर यांनी आज (सोमवारी) महापालिका प्रवेशद्वारावर स्वखर्चाने सॅनिटायझर टनेल बसविले आहे.

महापौर उषा ढोरे यांच्या हस्ते सॅनिटायझर टनेलचे उद्घघाटन करण्यात आले. यावेळी स्थायी समिती सभापती संतोष लोंढे, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, विरोधी पक्षनेते नाना काटे, नगरसेविका वैशाली काळभोर, अनुराधा गोफणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, अतिरिक्त आयुक्त अजित पवार उपस्थित होते.

पिंपरी-चिंचवड शहरामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. शहरातील वेगवेगळ्या भागात बाधित रुग्ण सापडत आहेत. त्यांच्यापैकी 18 रुग्णांवर यशस्वी वैद्यकीय उपचार करण्यात येऊन त्यांना घरी सोडण्यात आले आहे. शहरात वाढत्या कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिका, पोलीस प्रशासन योग्य ती खबरदारी घेत आहे. परंतु कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता आणखी प्रभावी उपाययोजना करण्याची गरज आहे.

त्याअनुषंगाने वायसीएम रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर डॉक्टर, नर्सेस,वॉर्ड बॉय, सफाई कर्मचारी व अन्य अत्यावश्यक सेवेतील कर्मचा-यांच्या सुरक्षितेसाठी सँनिटायझर टनेल बसविण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका मुख्यालयामध्येही कोरोना विषाणूच्या अनुषंगाने विविध बैठका होतात. यामध्ये पोलीस प्रशासन अत्यावश्यक सेवेतील अधिकारी डॉक्टर्स व कर्मचारी आदीचा समावेश असतो. त्यामुळे महापालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर सॅनिटायझर टनेल बसविण्याची मागणी होत असल्याने धर यांनी स्वखर्चाने टनले बसविला आहे.

नगरसेविका सुलक्षणा धर म्हणाल्या की, ”आज कोरोना विषाणूच्या विरोधात महापालिका, पोलीस प्रशासन दिवस-रात्र लढत आहे. त्याचप्रमाणे सत्ताधारी व विरोधीपक्षही या साथीच्या विरोधात एकजुटीने लढत आहे. त्यामुळे एक नगरसदस्या म्हणून मदत नव्हे तर कर्तव्य या भावनेतून सॅनिटायझर टनेल बसविण्याचा निर्णय घेतला. याचा अधिकारी, कर्मचा-यांना उपयोग होईल. कोरोनाच्या या लढाईच्या विरोधात लढण्यास आपल्या अधिका-यांना/ कर्मचा-यांना बळ मिळेल”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.