Pimpri: पंतप्रधानांवर टीका करण्यापेक्षा राष्ट्रवादीच्या आमदाराने मोफत धान्य मिळवून देण्यासाठी  प्रयत्न करावेत – अमोल थोरात

एमपीसी न्यूज – दिवे लावून, टाळ्या वाजवून कोरोना जाणार नाही हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही माहित आहे. अशा सर्व क्रिया केल्याने जनतेचे मनोधैर्य वाढते. त्यासाठी पंतप्रधानांकडून दिवे लावण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे त्यावर टीका करण्यापेक्षा राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे यांनी नागरिकांना विनाअट तीन महिन्याचे धान्य मोफत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत, असा सल्ला भाजपचे संघटन सरचिटणीस अमोल थोरात यांनी दिला आहे.

घरातील दिवे बंद करून मेणबत्ती, मोबाईल फ्लॅशची लाईट लावण्याचा सल्ला म्हणजे देशातील नागरिकांची दिशाभूल आहे. हे विज्ञानाला धरुन नाही, अशी टीका पिंपरीचे राष्ट्रवादीचे आमदार आण्णा बनसोडे यांनी केली होती. त्याला भाजपच्या थोरात यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

संपूर्ण देश कोरोना संसर्ग रोखण्यासाठी घरात बसून लढा देत आहे. बाहेर डॉक्टर, रुग्णालयांमधील कर्मचारी, पोलीस तसेच शासकीय अधिकारी व कर्मचारी कोरोना विरोधात जीवावर उदार होऊन लढा देत आहेत. कोरोनाला हद्दपार करण्यासाठी लॉकडाऊनशिवाय दुसरा पर्याय नाही.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला. घरातच राहिल्याने देशवासीयांचे मनोबल खचू नये, म्हणून पंतप्रधान  मोदी हे वेगवेगळे आवाहन करत आहेत.

देशावर संकट आलेले असताना आपण सर्व एक आहोत हे दाखविण्याची अपेक्षा असते. परंतु, राष्ट्रवादी काँग्रेसला प्रत्येक गोष्टीत राजकारण दिसते हे आमदार अण्णा बनसोडे यांनी दाखवून दिले आहे, अशी टीका थोरात यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.