Pimpri Ncp News : पेट्रोल, डिझेल व खतांच्या दरवाढीच्या निषेधार्थ राष्ट्रवादीचे आंदोलन

केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी

एमपीसी न्यूज – पेट्रोल, डिझेल, शेत खतांच्या दरवाढीच्या निषेधार्थ पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसने केंद्र सरकारच्या विरोधात आज (सोमवारी) आंदोलन केले. यावेळी केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली केंद्र सरकारने केलेल्या पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ निषेध आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनात महापालिकेतील विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, महिला अध्यक्षा वैशाली काळभोर, कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, नगरसेवक नाना काटे, मयूर कलाटे, विक्रांत लांडे, अजित गव्हाणे, युवक प्रदेश सरचिटणीस विशाल काळभोर, विधानसभा अध्यक्ष संदीप चिंचवडे, ओबीसी सेल अध्यक्ष विजय लोखंडे, प्रदेश ओबीसी प्रभारी सचिव सचिन औटे, पदवीधर शहराध्यक्ष माधव पाटील, ‘युवक’चे लाला चिंचवडे, महिला संघटिका कविता खराडे, ज्येष्ठ नागरिक अध्यक्ष यतीन पारेख, पिंपरी विधानसभा महिला अध्यक्ष पल्लवी पांढरे, भोसरी विधानसभा महिला अध्यक्ष मनीषा गटकळ, कामगार सेल अध्यक्ष किरण देशमुख, चिंचवड विधानसभा महिला अध्यक्ष संगीता कोकणे, सरचिटणीस अमोल भोईटे, उपाध्यक्ष अकबर मुल्ला, संतोष वाघेरे,शशिकांत निकाळजे, अभिजित आल्हाट, रशीद सय्यद, निखिल दळवी, बाळासाहेब पिल्लेवार, ज्योती निंबाळकर, सुनील अडागळे, पोपाट पडवळ यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

_MPC_DIR_MPU_II

संजोग वाघेरे पाटील म्हणाले, कोरोना महामारीच्या संकटामुळे आर्थिक विवंचनेत सापडलेल्या देशवासियांना पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढ करून आणखी संकटाच्या खाईत लोटण्याचे काम केंद्र सरकारने केले आहे. इंधन, गॅस दरवाढीसोबत खतांची दरवाढ करून भाजपशासित केंद्र सरकारने देशातील शेतक-यांचेही कंबरडे मोडले आहे.

भारतात पेट्रोलच्या किमती झपाट्याने वाढत आहेत. गॅसचे दर सातत्याने वाढविले जात आहे. कोरोना संकटाचा परिणाम उद्योग, धंदे, व्यावसायावर झालेला आहे. या परिस्थितीत केंद्रातील सरकारने नागरिकांना दिलासा देण्याची आवश्यकता होती. परंतु, केंद्रातील सरकार इंधन, गॅस दरवाढ करून जनतेला आणखी संकटात टाकण्याचे काम करत आहे.

पेट्रोलचे दर शंभर रुपयांच्यावर गेलेले आहेत. केंद्र सरकारने म्हणजेच देशातील भाजप सरकारने आज जनसामान्यांना दुसरा धक्का दिला आहे. संकटाच्या घडीला खतांच्या किमती भरमसाठ वाढविण्याचे पाप भाजप सरकारने केले. कोणत्याही परिस्थितीमध्ये ही दरवाढ कमी केली पाहिजे, अशी राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी आहे. कोरोनामुळे देशातील शेतकरी आधीच अडचणीत असताना खतांची दरवाढ करून भाजपशासित केंद्र सरकारने शेतक-यांचे कंबरडे मोडले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.