Pimpri : पाडापाडीच्या राजकारणाचा भस्मासूर उलटला पवार घराण्यावरच ! आता तरी बोध घेणार का?

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात आजपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पाडापाडीचेच राजकारण झाले. या पाडापाडीच्या राजकारणाला तत्कालीन नेतृत्वाने सातत्याने पाठबळ दिल्याचे दिसून येते. जो निवडून येईल. तो आपलाच ही भुमिका आज पक्षाला मारक ठरली. पाडापाडीचे राजकारण केल्याने पवार कुटुंबातील सदस्याला देखील त्याचा फटका बसला. पाडापाडीच्या राजकारणाचा भस्मासूर पवार घराण्यावरच उलटला. मावळ लोकसभा मतदारसंघातून पार्थ पवार यांचा दारुण पराभव झाला. हा पराभव पवार कुटुंबाला चांगलाच जिव्हारी लागला आहे. त्यामुळे आता तरी पाडापाडीच्या राजकारणातून बोध घेणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. अन्यथा विधानसभा निवडणुकीत शहरातील पक्षाचे अस्तित्व संपुष्टात येऊ शकते.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नुकताच पिंपरी-चिंचवड शहरात येऊन संघटनेचा आढावा घेतला. पराभवाचे चिंतन केले. लोकसभेच्या निकालाने खचून न जाता विधानसभेच्या तयारीला लागण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना केल्या. त्यामुळे नाऊमेद कार्यकर्त्यांमध्ये थोडीशी जान आली. पवार साहेबांसमोर अनेक कार्यकर्त्यांनी आपल्या व्यथा मांडला. जवळच्या लोकांना पदे दिली जातात. पक्षात गटबाजी मोठ्या प्रमाणात आहे. निवडणुकीत ‘याला पाड त्याला पाड’ अशी भूमिका घेतली जाते. त्यामुळेच शहरात राष्ट्रवादीचे नुकसान झाल्याची व्यथा त्यांच्यासमोर मांडली. परंतु, या पाडापाडीच्या राजकारणाला कोणाचे पाठबळ होते पाहणे देखील तितकचे महत्वाचे होते. पवार यांच्यासोबत शहराचे माजी कारभारी अजित पवार उपस्थित नव्हते, हे विशेष आहे.

शरद पवार यांनी स्वतःहून कार्यकर्त्यांना बोलण्यास सांगितले. कार्यकर्त्यांनी आपली मते स्पष्टपणे मांडली. पक्षाचे नुकसान का होते, हे सांगितले. अजित पवार यांनी कधीच सामान्य कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली नाहीत. त्यांनी दरबारी राजकारण केले. चार-पाच लोकांच्या कंपूचे ऐकून निर्णय घेतले. पक्षाच्या उमेदवाराच्या विरोधात उघडपणे काम केले. तरी, नगरसेवक, पदाधिका-यांवर कोणतीही कारवाई केली नाही. जो निवडून येईल, तो आपलाच ही भूमिका घेतली. त्यातून पाडापाडीच्या राजकारणाला पाठबळ दिले. शहरातील नेतृत्व पुढे येऊ नये यासाठी या गटबाजीला एकप्रकारे खतपाणीच घातले गेले. त्यामुळे राजकीय वारे बदलताच एकेकाळी अतिशय जवळचे असलेले सहकारी साथ सोडून गेले. परिणामी, महापालिकेतील सत्तेला सुरुंग लागला. स्व:तच्या मुलाचा पराभव पहावा लागला. पाडापाडीच्या राजकारणाचा भस्मासूर पवार घराण्यावरच उलटला.

राष्ट्रवादीतील पाडापाडीचा आजपर्यंतचा इतिहास

पुणे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधानपरिषदेच्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीने दिवंगत चंदूकाका जगताप यांना उमेदवारी दिली होती. त्यावेळी राष्ट्रवादीत असलेले लक्ष्मण जगताप यांनी बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढविली. ते निवडूनही आले होते. त्यांना राष्ट्रवादीतील नगरसेवकांनी उघडपणे मदत केली होती. त्यानंतर 2009 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत आघाडीच्या फॉर्म्युल्यानुसार चिंचवड विधानसभा मतदारसंघ काँग्रेसला सुटला. काँग्रेसने भाऊसाहेब भोईर यांना उमेदवारी दिली. त्यावेळी लक्ष्मण जगताप यांनी अपक्ष निवडणूक लढविली आणि ते जिंकूनही आले. त्यांनी राष्ट्रवादीचे सहयोगी सदस्यत्व स्वीकारले होते.

तत्कालीन महापौरांसह राष्ट्रवादीच्या अनेक नगरसेवकांनी जगताप यांचा प्रचार केला होता. त्यावेळी आघाडीच्या उमेदवाराविरोधात प्रचार करुन देखील एकाही नगरसेवकावर पक्षाने कारवाई केली नाही. मावळ मतदारसंघातील 2014 च्या लोकसभा निवडणुकीत देखील लक्ष्मण जगताप यांनी शेकाप-मनसेच्या पाठिंब्यावर निवडणूक लढविली होती. त्यावेळी देखील राष्ट्रवादीचे अनेक नगरसेवक, पदाधिका-यांनी त्यांचा प्रचार केला. तरी देखील पक्षविरोधात काम करणा-यांवर कोणतीही कारवाई केली नाही.

2009 च्या लोकसभा निवडणुकीत आझम पानसरे यांचा पाडापाडीच्या राजकारणातूनच पराभव झाला. भोसरी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या उमेदवार मंगला कदम होत्या. त्यावेळी विलास लांडे यांनी बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढविली आणि ते निवडूनही आले. नंतर त्यांनी राष्ट्रवादीचे सहयोगी सदस्यत्व स्वीकारले. राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी उघडपणे लांडे यांचा प्रचार केला होता. परंतु, त्यांच्यावर शिस्तभंगाची देखील कारवाई करण्यात आली नाही.

2014 च्या विधानसभा निवडणुकीत विलास लांडे राष्ट्रवादीचे उमेदवार होते. तर, राष्ट्रवादीकडून महापालिकेच्या स्थायी समितीचे सभापती असलेल्या महेश लांडगे यांनी बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढविली आणि ते निवडूनही आले. राष्ट्रवादीच्या अनेक नगरसेवकांनी लांडगे यांचा उघडपणे प्रचार केला. तरी देखील पक्षाने लांडगे आणि पक्षाच्या विरोधात काम करणा-या एकाही नगरसेवकावर कोणतीही कारवाई केली. त्यानंतर लांडगे यांनी भाजपचे सहयोगी सदस्यत्व स्वीकारले.

पक्षाच्या विरोधात बिनधास्तपणे काम करुन देखील एकाही नगरसेवक, पदाधिका-यावर कारवाई केली नाही. जो निवडून येईल तो आपलाच अशी भूमिका घेतली. त्यामुळे त्या पाडापाडीला तत्कालीन नेतृत्वाने एकप्रकारे खतपाणीच घातले गेल्याचा सूर आळवला जात आहे. ‘याला पाड त्याला पाड’ यामुळेच पक्षाचे नुकसान झाल्याचे आता सामान्य कार्यकर्ते पवार साहेबांसमोर उघडपणे सांगत आहेत. विधानसभा निवडणुकीला पाडापाडीतून बोध न घेतल्यास राष्ट्रवादी काँग्रेसची शहरातील अस्तित्व संपुष्टात येऊ शकते. त्यामुळे आता तरी राष्ट्रवादी काँग्रेस पाडापाडीचे राजकारण सोडून देणार का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.