Pimpri: राष्ट्रवादीची ‘निर्धार परिवर्तन’ यात्रा शनिवारी शहरात; सांगवीत जाहीर सभा

एमपीसी न्यूज – केंद्र, राज्य सरकारच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने राज्यात काढण्यात येत असलेली ‘निर्धार परिवर्तन’ येत्या शनिवारी (दि. 2) पिंपरी-चिंचवड शहरात येणार आहे. सायंकाळी साडेपाच वाजता सांगतीवीतील पीडब्ल्युडी मैदानावर जाहीर सभा होणार आहे.

याबाबतची माहिती माजी आमदार विलास लांडे यांनी आज (बुधवारी) पत्रकार परिषदेत दिली. यावेळी विरोधी पक्षनेते दत्ता साने, नगरसेवक नाना काटे, भाऊसाहेब भोईर, महिला शहराध्यक्ष वैशाली काळभोर, कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, युवक कार्याध्यक्ष योगेश गवळी, प्रवक्ते फजल शेख, वर्षा जगताप उपस्थित होते.

या सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, छगन भुजबळ, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी मंत्री सुनिल तटकरे, खासदार सुप्रिया सुळे, शशिकांत शिंदे मार्गदर्शन करणार आहेत.

राज्य आणि केंद्र सरकारचा भ्रष्टाचार, स्मार्ट सिटीच्या नवाने शहरात वाढलेला बकालपणा, फसलेली जीएसटी, नोटाबंदी मंत्रिमंडळातील घोटाळे, दुष्काळ हाताळण्यात आलेले अपयश असे अनेक प्रश्‍न घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसने 10 जानेवारीपासून रायगड येथून निर्धार परिवर्तन यात्रा सुरू केली आहे. राज्यातील इतर जिल्ह्यांचा दौरा करून शनिवारी ही यात्रा पिंपरी-चिंचवड शहरात येणार असून सायंकाळी साडेपाच वाजता सांगवीतील पीडब्ल्युडी मैदानावर जाहीर सभा होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.