Pimpri:  महापालिकेतील राष्ट्रवादी, शिवसेना, मनसे नगरसेवकांचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला; उपमुख्यमंत्र्यांकडे धनादेश सुपूर्द

मपीसी न्यूज –  कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी राज्य सरकारकडून सर्वच स्तरातून प्रयत्न सुरू आहेत. त्याच पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड महापालिकेतील राष्ट्रवादी, शिवसेना आणि मनसेच्या नगरसेवकांनी राज्य सरकारला मदतीचा हात  दिला आहे. सर्व नगरसेवकांचे गेल्या महिन्याचे संपूर्ण मानधन मुख्यमंत्री सहाय्यता निधी देण्यात आले. या निधीचा धनादेश उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे  आणि विरोधी पक्षनेते नाना काटे उपस्थित होते.

पिंपरी चिंचवड महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे 38 नगरसेवक आहेत. तर शिवसेनेचे 9 आणि मनसेचे एक अशा एकूण 48 नगरसेवकांनी आपले एक महिन्याचे मानधन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिले आहे. यासंदर्भात बोलताना विरोधी पक्षनेते नाना काटे म्हणाले की, कोरोना विरोधातील लढ्यात राज्य सरकार योग्य त्या उपाययोजना करीत आहे. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे पिंपरी चिंचवड शहरावर बारकाईने लक्ष आहे. शहरातील रुग्ण तसेच परिस्थिती संदर्भात दररोज त्यांच्याकडून विचारपूस केली जात आहे.

 

शहरातील राष्ट्रवादी, शिवसेना तसेच मनसेच्या नगरसेवकांकडून  प्रशासनाला योग्य ते सहकार्य केले जात आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जे काही निर्णय प्रशासन घेत आहे, त्याला सर्व नगरसेवक प्रतिसाद देत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि मनसेच्या नगरसेवकांनी एक महिन्याचे मानधन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देण्याचे ठरवले होते. त्यानुसार आज एकत्रित असा धनादेश उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला. नाना काटे  : विरोधी पक्षनेते,  पिंपरी चिंचवड पिंपरी चिंचवड. 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.