Pimpri : राष्ट्रवादी आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; माजी उपमहापौरांसह चौघांना अटक

परस्पर विरोधी गुन्हे दाखल

एमपीसी न्यूज – मतदानाच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी झाली. याप्रकरणी खुनी हल्ल्याचे परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पिंपरी पोलिसांनी माजी उपमहापौरांसह चार जणांना अटक केली आहे.

अभिनव सुरेंद्रकुमार सिंग (वय 30, रा. तपोवन मंदिराजवळ, पिंपरी) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार हिरानंद उर्फ डब्बू आसवाणी (वय 51, रा. पिंपरी) व त्यांचे तीन कार्यकर्ते साथीदार (नाव, पत्ता माहिती नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अभिनव सिंग हे बबलू सोनकर यांच्या गाडीचे चालक आहेत. बबलू सोनकर यांचे सासरे गौतम चाबुकस्वार हे विधानसभा निवडणुकीकरिता पिंपरी मतदार संघातून शिवसेनेच्या तिकीटावर निवडणूक लढवत आहेत. सोनकर व त्यांचे कार्यकर्ते सोमवारी (दि. 21) सकाळी पिंपरी परिसरात फिरत होते. दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास सोनकर हे आसवानी यांच्या घराजवळून जात असताना आसवानी व त्यांच्या साथीदारांनी सोनकर यांची मोटार अडवली. कार्यकर्ते अनिल पारचा, उमाशंकर राजभरव आणि फिर्यादी यांना रस्त्यात अडवून लाकडी बांबू, सिमेंट गट्टू यांनी मारहाण करून गंभीर जखमी करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला.

डब्बू आसवानी हे माजी उपमहापौर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान नगरसेवक आहेत. त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर बाबर तपास करीत आहेत.

याच्या परस्पर विरोधात डब्बू आसवानी यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार बबलू सोनकर (वय 40, रा. तपोवन मंदिराजवळ, पिंपरी), जितू मंगतानी (वय 32), अरुण टाक (वय 40), दीपक टाक (वय 38), लच्छू बुलाणी (वय 55), मोहित बुलाणी (वय 30), अनिल पारछा (वय 35, सर्व रा. पिंपरी) तसेच बबलू सोनकर यांचे तीन बॉडीगार्ड व इतर साथीदार (नाव, पत्ता माहिती नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी दुपारी आरोपी हे बेकायदा जमाव जमवून फिर्यादी आसवानी यांच्या घराजवळ आले. त्यावेळी आरोपी अरुण टाक, दीपक टाक यांनी आसवानी यांना पकडले आणि “बबलू इसको खलास कर दे,” असे म्हणाले. सोनकर यांनी आसवानी यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने हातातील पिस्तुल आसवानी यांच्या डोक्याला लावली व जीवे मारण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आरोपी जितू मंगतानी यांनी त्याच्याकडील पिस्तूल कार्यकर्त्यांना दाखवून कोणी मध्ये पडल्यास एकेकाला खल्लास करीन, असे मोठ्याने ओरडून दहशत निर्माण केली. आसवानी यांना जबरदस्तीने मोटारीत बसवण्याचा प्रयत्न केला.

पोलिसांनी बबलू सोनकर, जितू मंगतानी आणि लच्छू बुलाणी यांना अटक केली आहे. साहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर चव्हाण तपास करीत आहेत. पोलिसांनी आरोपींकडून दोन पिस्तुल, 11 जिवंत काडतुसे आणि इनोव्हा कार जप्त केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.