Pimpri: ‘याला पाड, त्याला पाड’ या भूमिकेने राष्ट्रवादीचे नुकसान; कार्यकर्त्यांची शरद पवार यांच्यापुढे व्यथा

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात पवार साहेब, अजितदादा आले की कार्यकर्ते एकत्र येतात. इतरवेळी कोणीही येत नाही. आंदोलनाला देखील कोणीच येत नाही. शहरात संघटना खिळखिळी झाली आहे. संघटनेला कोणीच महत्व देत नाही. जवळच्या लोकांना पदे दिली जातात. पक्षात गटबाजी मोठ्या प्रमाणात आहे. निवडणुकीत ‘याला पाड, त्याला पाड’ अशी भूमिका घेतली जाते. त्यामुळे शहरात राष्ट्रवादीचे नुकसान झाल्याची भावना कार्यकर्त्यांनी शरद पवार यांच्यासमोर मांडली. तसेच पक्ष सोडून गेलेल्यांवर देखील हल्लाबोल केला. आगामी निवडणुकीत तुम्ही विचारपूर्वक उमेदवार द्या, त्याला आम्ही निवडून आणण्यासाठी प्रयत्न करु, अशी ग्वाही देखील कार्यकर्त्यांनी दिली.

महापालिका आणि सलग दुस-यावेळी मावळ लोकसभा मतदारसंघात झालेल्या पराभवानांतर शरद पवार यांनी आज (गुरुवारी) कार्यकर्त्यांना लढण्यासाठी प्रेरणा दिली. त्यांना मार्गदर्शन केले. पवार यांनी कार्यकर्त्यांना आपली मते मांडण्यास सांगितले. त्यावेळी अनेकांनी संघटना कमकुवत असल्याची भावना मांडली.

  • यावेळी अरुण बो-हाडे म्हणाले, ”पक्षाच्या कार्यक्रमाला पदाधिकारी येत नाहीत. संघटनेला महत्व दिले जात नाही. प्रोटोकॉल पाळला जात नाही. संघटनेकडे दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे संघटना बांधणी करण्याकडे सर्वांनी लक्ष द्यावे. युवकांना सामावून घ्यावे”.

त्यानंतर तानाजी खाडे म्हणाले, ”पक्षाने कोणताही उमेदवार दिला तरी सर्वांनी त्याचे काम केले पाहिजे. ज्यांना दिले ते सगळे सोडून गेलेत. त्यांना लाज वाटली पाहिजे”.

  • आनंद यादव म्हणाले, पक्षात मोठी गटबाजी आहे. त्यामुळेच आपला पराभव होतो. यावेळी भाकरी फिरवा, उमेदवार बदला. नवीन चेह-याला संधी देण्यात यावी. कार्यकर्त्यांचा विचार केला जात नाही. वापरून घेतले जाते. कोणाच्या घरुन नव्हे तर पक्षाच्या कार्यालयातून तिकिटे द्यावेत”

नाना लोंढे म्हणाले, ”लोकसभा निवडणुकीला पिंपरी, चिंचवड आणि भोसरी या तीनही विधानसभा मतदार संघातून मताधिक्य मिळाले नाही. भोसरीतून सुद्धा आपण मागे आहोत. ‘याला पडायचे, त्याला जोडायचे हेच आजपर्यंत काम राहिले. पदे दिलेली लोक सोडून गेलेत”.

  • भाऊसाहेब भोईर म्हणाले, ”संघटनेला महत्व दिले जात नाही. नेते चर्चा करत नाहीत. पदे मिळविण्यासाठी चढाओढ सुरू आहे. एकमेकांचा आदर केला जात नाही. पदे दिली नाही की पाडायची भाषा केली जाते. चांगले नाही करता आले तर वाईट करू नका. साहेब जो उमेदवार देतील. त्याचे काम करा. मी आमदार झालो नाही तर चालेल पण, याला पाडणार ही भूमिका सोडा. 2009 पासून हा पाडापाडीचा लागलेला रोग सोडून द्या, असेही ते म्हणाले.

दत्ता साने म्हणाले, ”राष्ट्रवादीने केलेली विकास कामे जनतेपर्यंत पोहचविण्यात आपण कमी पडलो. भोसरीत चांगले काम केले. उमेदवार निवडून आला. चांगला उमेदवार दिला. उमेदवार कोणीही द्या. फक्त लवकर उमेदवार जाहीर करा. आम्ही राजकारण सोडून एकदिलाने काम करुन उमेदवार निवडून आणू, शेवटच्या क्षणी उमेदवार जाहीर केल्यास अडचण येते. पक्षाच्या आंदोलनाला ठराविकच लोक येतात. चांगले दिवस पाहिजे असतील तर सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे.

  • विलास लांडे म्हणाले, ”लोकसभेला सर्वांनी मतभेद सोडून काम केले. त्यामुळे आपला उमेदवार निवडून आला. आजपर्यंत पक्षाने एवढी पदे दिली ते लोक पक्ष सोडून गेली. आपल्याकडे मोठी झाले. पदे भोगून गेली आहेत. आतापासून नियोजन केले तर तीनही मतदार संघ अवघड नाहीत. सर्वांनी मतभेद विसरायचे आहेत. भोसरीत अडचण येणार नाही. विधानसभेला चोरांच्या हातात सत्ता जाणार नाही. आपण 15 वर्षात केलेल्या कामांची जाहिरात केली पाहिजे. भाजपने दोन वर्षात काय केले आहे, हे जनतेला सांगितले पाहिजे. आता आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत. कारण, आम्हाला कोणीही विचारत नाही”, असेही ते म्हणाले.

संजोर वाघेरे म्हणाले, ”विकासकामे लोकांपर्यंत पोहचवायला आम्ही कमी पडलो. मावळात आम्ही कमी पडलो. प्रलंबित प्रश्न घेऊन जनतेत गेलो. पण हिंदुत्व आणि पुलवामा हल्याला सरकारने दिलेले प्रत्युत्तर पाहून जनतेने भाजप-शिवसेनेला मतदान केले. आता विधानसभेला नक्कीच चित्र वेगळे असले. जो उमेदवार द्याल. त्याचे आम्ही प्रामाणिकपणे काम करू, स्वतःला तिकीट मिळाले असे समजून सर्वांनी काम करावे”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.