Pimpri: घरोघरचा कचरा गोळा करण्यासाठी शुल्क आकारण्यास राष्ट्रवादी काँग्रेसचा विरोध 

विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी केला विरोध  

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विविध करांमुळे शहरवासिय त्रस्त आहेत. त्यात आता नागरिकांकडून घरोघरचा कचरा गोळ्या करण्यासाठी दरमहा 60 रुपये शुल्क आकारण्याचे विचाराधीन असून हे अन्यायकारक आहे. त्यामुळे कचरा गोळा करण्यासाठी 60 रुपये शुल्क आकारण्यात येऊ नये, अशी मागणी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी केली आहे. शुल्क आकारल्यास राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आंदोलन केले जाईल, असा इशारा त्यांनी दिला आहे. तसेच व्यावसायिक, रुग्णालये, संस्था, फेरीवाले यांच्याकडून शुल्क आकारण्यास कोणताही आक्षेप नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

शहरातील नागरीकांसाठी पाणी, आरोग्य, दिवाबत्ती व कचरा संकलन या मूलभूत सुविधा पुरविणे महापालिकेचे आद्यकर्तव्य आहे. त्यातही महापालिका मिळकर कर वसूल करताना त्यामध्ये प्रशासकीय सेवा शुल्क, सामान्य कर, वृक्ष कर, उपकर मलप्रवाह, सुविधा लाभकर, पाणीपुरवठा व रस्ता कर इत्यादी प्रकारचे कर नागरीक भरत असतात. कचरा संकलन हे महापालिका पुरवित असलेल्या पायाभूत सुविधा पैकी एक आहे. त्यासाठी घरटी दरमहा 60 रुपये आकारणे संयुक्तिक वाटत नाही, नागरीकांच्यावर ते अन्यायकारक होईल. शहरातील नागरीक अगोदरच मनपाचे मिळकत कर, शास्तीकर, पाणी पट्टी कर इत्यादीमुळे त्रस्त आहेत.

घरोघरीचा कचरा संकलन करण्यासाठी घरटी 60 रुपये उपयोगकर्ता शुल्क आकारणे शहरातील नागरीकांवर अन्यायाचे होईल. तसेच इतर व्यावसायिक, रुग्णालये, संस्था, फेरीवाले यांना उपयोगकर्ता शुल्क आकारण्याबाबत आक्षेप नाही. कारण ते व्यवसाय करतात. त्यामुळे त्यांना त्यांच्या व्यवसायातून निर्माण होणा-या कचरासाठी शुल्क आकारणे संयुक्तीक आहे. परंतु, घरोघरीचा कचरा हा कुठल्याही व्यवसायासातून निर्माण होत नाही. त्यामुळे घरोघरीचा कचरा गोळा करण्यासाठी दरमहा 60 रुपये उपयोगकर्ता शुल्क आकारण्यास राष्ट्रवादी काँग्रेसचा तीव्र विरोध आहे, असे विरोधी पक्षनेते साने यांनी सांगितले आहे. याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन देण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.