Pimpri: शहरातील 47 संशयितांचे रिपोर्ट निगेटीव्ह; ‘कोरोनामुक्त’ बाराव्या रुग्णाला डिस्चार्ज

शहरात आता तीन कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या रुग्णालयात संशयित म्हणून दाखल झालेल्या 47 जणांचे रिपोर्ट आज (शनिवारी) निगेटीव्ह आले आहेत. त्यामध्ये दिल्लीतील धार्मिक कार्यक्रमातून आलेल्या नागरिकांच्या सहवासातील व्यक्तींचे देखील रिपोर्ट आहेत. तसेच पहिल्या बारापैकी बाराव्या रुग्णाचे दुसरे रिपोर्टही निगेटीव्ह आले असून, त्याला आज घरी सोडले आहे. यामुळे शहरात आता दिल्लीतून आलेले दोन आणि त्यांच्या  ‘हाय रिस्क कॉन्टॅक्ट’मधील एक असे तीन कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आहेत.

पिंपरी-चिंचवड शहरात 12 मार्च रोजी कोरोनाचे पहिले तीन रुग्ण ‘पॉझिटीव्ह’ आढळले होते.  त्यानंतर लागोपाठा बारा रुग्ण कोरोना पॉझिटीव्ह आढळले होते. त्यातील पहिले तीन रुग्ण 27 मार्च रोजी  ‘कोरोनामुक्त’ होत ठणठणीत बरे झाले. तर,  28 मार्च रोजी आणखी सहा रुग्ण कोरोनामुक्त झाले होते. त्यानंतर 31 मार्च रोजी एक आणि 2 एप्रिल रोजी एक असे दोन रुग्ण कोरोनामुक्त झाले होते.  त्यानंतर पहिल्या बारापैकी शेवटच्या रुग्णांचे दुसरे रिपोर्टही आज शनिवारी (दि.4) निगेटीव्ह आले. त्यामुळे या रुग्णाला घरी सोडण्यात आल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले.

दिल्लीच्या निझामुद्दीन भागातील तबलिगी जमातच्या मर्कझमधील धार्मिक कार्यक्रमांतून पिंपरी-चिंचवड शहरात आलेल्या  23 नागरिकांपैकी दोघांना कोरोनाची लागण झाल्याचे गुरुवारी (दि.2) स्पष्ट झाले. त्यानंतर त्यांच्या ‘हाय रिस्क कॉन्टॅक्ट’मधील एकाला शुक्रवारी (दि.3) कोरोनाची लागण झाल्याचे रिपोर्ट आले. त्यामुळे शहरात आता कोरोनाचे तीन पॉझिटीव्ह रुग्ण आहेत.

संशयित म्हणून महापालिका रुग्णालयात दाखल झालेल्या 47 जणांचे रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत. तर, दिल्लीतील धार्मिक कार्यक्रमातून आलेल्या नागरिकांच्या सहवासातील सर्व व्यक्तींचे देखील रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत. आता  ‘हाय रिस्क कॉन्टॅक्ट’मधील पॉझिटीव्ह रुग्णाच्या नातेवाईकाचे रिपोर्ट येणे बाकी असल्याचे, महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने सांगितले आहे.

दरम्यान, पिंपरी-चिंचवड शहरात आजपर्यंत कोरोना पॉझिटीव्ह 15 आढळले होते.  त्यापैकी पहिले बारा रुग्ण ‘कोरोनामुक्त’ झाले आहेत. त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तीन पॉझिटीव्ह रुग्णांवर महापालिका आयसोलेशन कक्षात उपचार सुरु आहेत. त्यांची प्रकृती स्थिर आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.