Pimpri News : शहराच्या विविध भागातून पाच अपहरणाच्या तक्रारी

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड शहराच्या विविध भागातून अपहरणाच्या पाच घटना समोर आल्या आहेत. चिखली, हिंजवडी, चिंचवड आणि पिंपरी या भागात अपहरणाच्या घटना मागील दोन ते तीन दिवसात घडल्या आहेत.

अपहरणाची पहिली घटना पाटील नगर, चिखली येथे शुक्रवार (दि.26) रोजी घडली. याप्रकरणी एका इसमाने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांची 13 वर्षीय मुलगी झेरॉक्स घेऊन येण्यासाठी घराबाहेर गेली असता तिचे अपहरण झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी अज्ञाताविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुसगाव येथून 10 वर्षीय मुलाचे मंगळवारी (दि.23) अपहरण झाल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी एका इसमाने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनिल पवार याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चिंचवडेनगर, वाल्हेकरवाडी येथून 16 वर्षीय मुलीला कुणीतरी फूस लावून पळवून नेल्याची तक्रार चिंचवड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवारी (दि.26) हा प्रकार उघडकीस आला.

चौथी अपहरणाची घटना यशवंत नगर, पिंपरी येथे शुक्रवारी घडली. 17 वर्षीय मुलीचे अज्ञाताने अपहरण केल्याचे महिलेने दाखल केलेल्या फिर्यादीत म्हटले असून, याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पिंपरीत दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण झाले आहे. या दोन्ही मुली मैत्रिणी असून, शाळेत विज्ञान विषयाची कागदपत्रे देण्यासाठी जातो असे सांगून गेल्या असता त्या घरी परतल्या नाहीत असे फिर्यादीत म्हटले आहे. शुक्रवारी (दि.26) ही घटना घडली. याप्रकरणी अज्ञाताविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.